चेन्नईतले संकट

chennai
चेन्नई शहरामध्ये अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला. पाऊस कसा बिनभरवशाचा झाला आहे आणि तो कसा विचित्रपणे पडत आहे याचे हे उदाहरण आहे. भारतातला पाऊस कमी झालेला नाही. मात्र तो अचानकपणे कोठेतरी एकदमच पडतो असे त्याचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे चेन्नईवर हे संकट कोसळले आहे. चेन्नईमध्ये असा बेमुर्वतखोरपणे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातले शेतकरी एखादा दुसरा तरी शिडकावा पडावा म्हणून आतूरतेने वाट बघत आहेत. पण त्याची कृपा महाराष्ट्रावर होत नाही आणि चेन्नईवर झालीच तर ती अवकृपेच्या रूपाने होत आहे. या शहराला वादळ आणि पाऊस यांचा मोठा फटका बसला.

मुख्यमंत्री जयललिता यांनी ही आपत्ती नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे म्हणणे पूर्ण सत्य नाही. एवढा पाऊस पडल्यास शहराचे नियोजन कसे राहणार आहे याचा विचार शहराची वाढ करताना केला गेला नाही हे खरे या गोंधळाचे कारण आहे. या बाबतीत केवळ जयललिताच नव्हे तर गेल्या २५ वर्षांपासून चेन्नईचे नियोजन करणारे सगळे सत्ताधारी जबाबदार आहेत. चेन्नई शहरामध्ये मुक्त अर्थव्यवस्था आल्यापासून औद्योगीकरणाला गती मिळाली. अनेक उद्योगांनी आपले बस्तान तेथे बसवले आणि शहराची प्रचंड वाढ व्हायला लागली. ही वाढ नियोजनबध्द पध्दतीने झाली असती आणि ते नियोजन करताना पर्यावरणाशी तडजोड केली नसती तर चेन्नईवरची आजची आपत्ती निश्‍चितच सुसह्य झाली असती.

ही केवळ चेन्नईची समस्या आहे असे नाही. बर्‍याच अंशी ती भारतातल्या अन्य शहरांची आणि काही प्रमाणात जगातल्या अन्यही शहरांची अवस्था आहे. जगातली अनेक शहरे आज बेसुमार आणि बेशिस्त वाढीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आली आहेत. आज दिल्लीमध्ये हवेचे प्रदूषण वाढल्यामुळे हवेत धुके वाढले आहे. हे धुके निव्वळ थंडीमुळे वाढलेले नाही. नाना प्रकारचे वायू हवेत मिसळले गेल्यामुळेही हे घडले आहे. म्हणून आता शहरात प्रवास करताना समोरचे दृश्य दिसणे मुश्किल झाले आहे. परिणामी दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईवर तर अधूनमधून अशा प्रकारचे संकट कोसळताना आपण पहातच असतो. थोडाबहुत पाऊस झाला की मुंबईची जीवन वाहिनी म्हणवणारी उपनगरी रेल्वे आहे तिथेच थांबून जाते. बंगळुरू शहर हे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून नावाजली गेली आहे. परंतु या शहरामध्ये एकाच दिवशी चार इंच पाऊस पडला की शहरातल्या गटारी भरून जातात आणि वाहतूक बंद पडते. भारताला निर्यातीचे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या सिलिकॉन व्हॅलीची ही अवस्था आहे. मग आग्रा, पाटणा, भोपाळ, लखनौ, कानपूर, कोलकाता या शहरांची अवस्था तर विचारायलाच नको.

Leave a Comment