मुलीच्या जन्माचे स्वागत

save-girl
मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती तशी या समाजात जुनीच आहे. त्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकत असतो. हरियाणा आणि राजपुतान्यामध्ये तर मुलगी जन्माला येताच तिला जन्म देणार्‍या मातेनेच तिच्या नरड्याला नख लावावे अशी पध्दत होती आणि ती काही गैर आहे असा विचार कोणाच्याही डोक्यात आलेला नव्हता. किंबहुना या भागातले अनेक लोक आपल्या घराण्यामध्ये गेल्या कित्येक पिढ्यात मुलगी जन्माला आलेलीच नाही अशी बढाई मिशावर हात फिरवून मारली जात होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वैगुण्य निर्माण झाली आणि अनेक समस्या खड्या झाल्या. परंतु एकूणच स्त्रीकडे बघण्याचा हिणकस दृष्टिकोन काही कमी झालेला नाही. आपल्या समाजामध्ये आणि विशेषतः हिंदू धर्मात महिलांच्या संबंधात अनेक विसंगती दिसून येतात. संस्कृत मंत्रांमध्ये महिलेचा मोठा गौरव केलेला असतो. स्त्रोत्रांमधून आणि पोथ्यांमधून देवीचे गुणगान गायलेले असते. स्त्री म्हणजे शक्ती आणि तिची आराधना करणे म्हणजे मोठे पुण्य असे पोथ्यापुराणात सांगितले जाते. यत्र नार्यस्तु पुज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशी सुभाषिते सांगितली जातात.

जेथे नारीची पूजा होते तिथेच देवता वास करतात, रमतात असे सुभाषितात मोठ्या तोंडाने म्हटले जाते. परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये या सुभाषिताशी विसंगत वर्तन केले जाते. नारीची पूजा करण्याऐवजी तिची खेटराने पूजा करण्यात मोठा पुरूषार्थ मानला जातो. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास कडूनिंबाची पाने खाल्ल्यागत चेहरा वाकडा केला जातो. अशावेळी संस्कृत सुभाषितात सांगितलेली शिकवण कोठे जाते असा प्रश्‍न पडतो. ही आपल्या स्त्रीकडे बघण्याची विसंगत दृष्टीच आता आपल्याला पश्‍चात्ताप करायला लावत आहे. आधीच मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट त्यातच विज्ञानाने प्रगती केली. मूल पोटात असतानाच म्हणजे गर्भावस्थेत त्याच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जन्माआधीची त्याची प्रकृती कशी आहे, याचा ठाव घेण्याची यंत्रणा विज्ञानाने विकसित केली. विज्ञान हे वरदानच असते. त्यामुळे ही सोनोग्राफीची यंत्रणा वरदानच होती. माणसाची बुध्दी मोठी किडकी आहे. त्यामुळे विज्ञान आणि निसर्ग यांनी उपलब्ध करून दिलेल्या चांगल्या सोयींचाही कसा वाईट वापर करता येतो. याचा विचार माणसाने सुरू केला. अल्ट्रा सोनोग्राफीचा उपयोग करून लोक पोटातला गभर् मुलाचा की मुलीचा हेच बघायला लागले. खरे म्हणजे ती मुलगी असो की मुलगा असो त्याची वाढ कशी होत आहे आणि त्याच्या वाढीमध्ये काही दोष आहे का हे बघण्यासाठी हे यंत्र निर्माण झाले होते.

मात्र त्याचा गैरफायदा घेऊन लोक गर्भाचे लिंगनिदान करायला लागले आणि गर्भ स्त्रीचा असल्यास सरसकट गर्भपात करायला लागले. कारण मुलगी कोणालाच नको असते. ती एक जीवनाची रिस्क किंवा जोखीम असते. तिला सांभाळावे लागते. तिच्या चारित्र्यावर लक्ष ठेवावे लागते. ग्रामीण भागातल्या गरिबांच्या मुली टारगट मुलांच्या वासनेचे भक्ष्य कधीही होऊ शकतात अशा सार्‍या कल्पनांपोटी कोणालाही मुलगी नको असते. त्यामुळे गेल्या २० वर्षांत भारतात ३ कोटी मुलींचे गर्भ जिरवले गेले आहेत. वास्तविक पाहता हा कायद्याने गुन्हा आहे आणि २० वर्षांत ३ कोटी गुन्हे घडले आहेत. परंतु त्या गुन्ह्यांबद्दल ३ लोकसुध्दा तुरूंगात गेलेले नाहीत. ही एक मोठी विसंगती आहे. कायद्याने समाजात मोठे बदल करता येत नाहीत असे वारंवार सांगितले जाते. त्याचे प्रत्यंतर या प्रवृत्तीमधून येते. समाजात बदल घडवायचे असतील तर कायद्याची भीती तर असावीच पण भीतीबरोबर समाजाचे प्रबोधनही केले जावे. शेवटी प्रबोधनानेच बदल घडत असतो. स्त्री भ्रूण हत्येची प्रवृत्ती हा निव्वळ गुन्हा नाही तर तो एक सामाजिक रोग आहे. त्यामुळे तो कमी करायचा असेल तर समाजामध्ये स्त्रीचा सन्मान वाढेल असे वातावरण तयार केले पाहिजे.

खरे म्हणजे स्त्री ही पुरूषांपेक्षा कोठेही कमी नसते. पुरुष करतात ती सारी कामे आता महिला करायला लागल्या आहेत. किंबहुना काही कामात तर मुलांपेक्षा मुली आणि पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल दरवर्षी जाहीर होतात तेव्हा तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समान सवलती आणि साधने उपलब्ध असूनही मुली मुलांपेक्षा काकणभर सरस ठरतात. मुलींमध्ये कोणत्याही प्रश्‍नाचे गांभीर्य लवकर बिंबते आणि देशाच्या विकासामध्ये या पुढच्या काळात मुलींचा म्हणजेच महिलांचा वाटा मोठा असणार आहे. म्हणूनच सरकारने केवळ बेटी बचाव एवढीच मोहीम न चालवता बेटी पढाव अशी पुस्ती त्याला जोडली आहे. तेव्हा स्त्री भ्रूण हत्या टाळली पाहिजे आणि मुलींना मुलाइतकेच शिक्षण दिले पाहिजे.