लालूपुत्रांचे शिक्षण

combo
देशाचे नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांचे शिक्षण किती झालेले असावे याबाबत काही कायदा नाही. मात्र तरीसुध्दा एखादा अशिक्षित पुढारी समाजाचे नेतृत्व जेवढ्या प्रभावीपणे करू शकतो त्यापेक्षा त्याच क्षमतेचा सुशिक्षित पुढारी अधिक प्रभावीपणे करू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुळातच देशात शिक्षणाचे प्रमाण कमी होते त्यामुळे कमी शिकलेले पुढारी निर्माण झाले, त्यांनी बर्‍यावाईट पध्दतीने समाजाचे नेतृत्वही केले. परंतु आताच्या प्रगत काळामध्ये देशाचे पुढारी अशिक्षित आणि अर्धशिक्षित असतील तर तो निश्‍चितपणे चिंतेचा विषय होऊ शकतो. हा विषय सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री तेजप्रतापसिंग यादव यांच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

लालूप्रसाद यादव यांची बिहारच्या मंत्रिमंडळात समावेश झालेली दोन्ही मुले उच्चशिक्षित नाहीत. या दोघांनीही जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. साहजिकच हा टिकेचा विषय झालेला आहे. असे अशिक्षित लोक बिहारची प्रगती काय करणार असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र हा प्रश्‍न उपस्थित करण्याने काही लोकांना वेदना होत आहेत. त्यातल्या काही लोकांनी शिक्षणाचा आणि नेतृत्वाचा कसा संबंध नसतो हे दाखवून द्यायला सुरूवात केली आहे. अशा लोकांना नेहमीच वसंतदादा पाटील यांचे उदाहरण देण्याचा मोह होतो. वसंतदादा पाटील हे चौथी पास होते तरीही त्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिले. हे आवर्जुन सांगितले जाते. हे खरेही आहे परंतु लालूप्रसाद यांच्या दोन्ही मुलांची वसंतदादांशी तुलना करणे सर्वथा गैर आहे.

वसंतदादा पाटील ज्या काळात लहानाचे मोठे झाले त्या काळात शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता. त्यामुळे ते फार शिकू शकले नाहीत. मात्र लालूप्रसाद यादव यांच्या मुलांची स्थिती तशी नाही. त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या अशी काही परिस्थिती नव्हती. घरात शिक्षणाची परंपरा नाही असाही काही प्रकार नाही. उलट लालूप्रसाद यादव यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. त्यांच्या घरामध्ये मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही असाही काही बहाणा करता येणार नाही. तेव्हा सारी परिस्थिती अनुकूल असतानाही लालूप्रसाद यांची ही दोन मुले फारशी शिकली नाहीत याला महत्त्व येते. गमतीचा भाग म्हणजे राज्यातल्या पिछड्या लोकांच्या कल्याणासाठी आपला जन्म झाला असल्याचा दावा करणार्‍या लालूप्रसाद यादव यांना आपल्या मुलांचे शिक्षण मात्र करता आले नाही. याचा अर्थ या दोन्ही मुलांना शिक्षणात रूची नव्हती असा होतो आणि ही गोष्ट चिंतेची आहे.

Leave a Comment