राज्य सरकार स्थापणार ‘निसर्ग पर्यटन विकास मंडळ’

tourism
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील ४८ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने आणि ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे. या मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राहाणार आहे.

राज्यातील विविध वन्यजीव क्षेत्राला दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात; परंतु तेथे पर्यटकांसाठी मुलभूत पायाभूत सुविधा नसल्याने क्षमता असूनही पर्यटक मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांना पसंती देतात. व्यावसायिक दृष्टिकोण ठेवून या क्षेत्राचा विकास केला तर भविष्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळे यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांकडे पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निसर्ग पर्यटनाच्या सुविधा वाढविण्यासोबतच वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन करणेही गरजेचे आहे. स्थानिकांची उपजीविका, स्थानिक लोकांची संस्कृती जतन करणे तसेच पर्यावरणाचा कोणताही -हास न होता निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी निसर्ग पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. वनसंपदेला धक्का न लावता स्थानिक रोजगारनिर्मिती करण्याची क्षमता निसर्ग पर्यटनामध्ये आहे. हा केंद्रबिंदू ठेवून पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे.

Leave a Comment