भाषा संपत आहेत

languages
जगातल्या ९१५ भाषा संपुष्टात येत आहेत असा अहवाल प्राप्त झाला आहे. यातल्या अनेक भाषा या बोलीभाषा आहेत. त्यातल्या काही भाषांना आपली स्वत:ची लिपी नाही. लिपी नसल्याने त्या भाषा केवळ बोलल्या जातात. त्याही केवळ एका विशिष्ट जनसमुदायातच बोलल्या जातात. आताच्या काळात कोणतीही भाषा जेवढी जास्त वापरली जाईल तितकी ती टिकण्याची आणि वाढण्याची संभावना आहे. सध्याच्या जगात शिक्षणाचे आणि त्यामुळे पर्यायाने लिहिणे आणि वाचण्याचे प्रमाण वाढत आहे. ज्या भाषांना स्वत:ची खास लिपी नाही त्या भाषा केवळ बोलण्यात म्हणजे मर्यादित प्रमाणात वापरात येतात. त्या लिहिण्याच्या भाषा नसल्याने त्यांचे शिक्षण घेण्याकडे कोणाचा कल नसतो. जी भाषा शिकल्याने आणि बोलण्याने नोकरी मिळते तीच भाषा शिकलेली बरी असा नव्या पिढीचा विचार असतो.

मराठीत अनेक बोली भाषा आहेत. त्या भाषा महाराष्ट्राच्या काही विशिष्ट भागात बोलल्या जातात. गेल्या वर्षी एका दैनिकाने मराठीतल्या बोलीभाषांवर एक विशेषांक काढला होता.त्यात असे दाखवण्यात आले होते की मराठीच्या अगदी ठळक म्हटल्या तरी १२ बोली भाषा आहेत. त्या बोली भाषा त्यांच्या भागात बोलल्या जातात. पण त्या भाषा बोलणारी मुले आणि मुली शाळांत जातात आणि मराठीचे पुस्तक वाचतात तेव्हा त्याना ते प्रमाण भाषेत असल्याचे दिसते तेव्हा ती मुले प्रमाण मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात. ती नोकरीसाठी घराबाहेर पडतात आणि मोठया शहरात जातात तेव्हा तिथेही त्यांना प्रमाण मराठी भाषेतच बोलावे लागते. साहजिकच ती मुले आणि त्यांच्यानंतरची पिढी आपली बोलीभाषा विसरून जातेे. अशा भाषा कालांतराने गतप्राण होतात.

त्या नष्ट झाल्या की त्यांच्याशी संलग्न असलेले सांस्कृतिक संचितही गतप्राण होते आणि ही आपली हानी असते. पण त्याला काही इलाज नाही. ज्याला ती भाषा जिवंत रहावी असेे वाटते त्यांनी या भाषांचा वापर वाढावा यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. तसे करणे कितपत व्यवहार्य ठरेल याचाही विचार करावा लागेल. कारण भाषांचा वापर करण्याचा वेग वाढत आहे. त्या वेगाशी आपला मेळ लागत नाही. विशेषत: तरुण पिढी नेटच्या भाषेत बोलत आहे आणि नेटवर तर ६० टक्के व्यवहार इंग्रजीतून होत असतो. म्हणूनच मागे पडलेल्या ज्या भाषांनी नेटवर येण्याचा नेटााने प्रयत्न केला त्याच भाषा टिकल्या आहेत. या बाबत मराठीने बर्‍यापैकी यश मिळवले आहे पण नेटची मराठी भाषा ही प्रमाण मराठी भाषा आहे. बोली भाषा नेटवर येतच नाहीत.

Leave a Comment