अंधःश्रध्दांचा बाजार

shani-shingnapur
शनी हा आपल्या ग्रहमालेतला एक ग्रह आहे. मुळात त्याला देव मानण्याचे काही कारण नाही. एखाद्या ग्रहाला देवच मानायचे असेल तर मग केवळ शनीच का? बुध, गुरु, शुक्र, चंद्र या ग्रहांची आणि उपग्रहांचीही मंदिरे का असू नयेत? मुळात शनी हा ग्रह आपल्यापासून काही करोड किलोमीटर अंतरावर आहे आणि तो आपल्या जीवनावर कसलाही परिणाम करत नाही आणि करत असतो असे वादासाठी मान्य केले तरी त्याची आरती करण्याने हा परिणाम टळत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये अलीकडच्या काळात शिक्षणात वाढ होऊनसुध्दा बोकाळत चाललेल्या अंधःश्रध्दांमध्ये शनीचे मंदिर, शनीची आरती आणि शनीचे उपवास या गोष्टीही वाढत चालल्या आहेत. एकदा अंधःश्रध्दांचा विळखा मान्यच करायचा म्हटला की त्या सोबत येणार्‍या सगळ्या कालबाह्य रूढी आणि काल विसंगत परंपरा याही निमूटपणे आहे तशा पाळल्या जातात. तशा त्या नगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर येथे अजूनही पाळल्या जातात. एवढेच नव्हे तर त्या पूर्वीपेक्षाही अधिक कट्टरपणे पाळल्या जायल्या लागल्या आहेत. शनी शिंगणापूरच्या या मंदिरात महिलांना दर्शनास जाण्यास बंदी आहे.

वाराणसीच्याही एका मंदिरात महिलांना अशीच अनुचित वागणूक देण्यात येते. दक्षिण भारतातल्या एका मंदिरात वय वर्षे १३ ते ४५ या वयोगटातील महिला वगळता अन्य महिलांनाच फक्त प्रवेश दिला जातो. या सगळ्या प्रकारातून आपल्या समाजात अजूनही अंधःश्रध्दांचा बाजार कसा भरलेला आहे याचे तर दर्शन घडतेच पण आपल्या समाजातल्या पुरूषांची महिलांकडे बघण्याची दृष्टी कशी हिणकसपणाची आहे याचेही दर्शन घडते. वास्तविक पाहता महिलांच्या मासिक धर्माची शास्त्रीय माहिती आता सुशिक्षित समाजाला उपलब्ध झालेली आहे परंतु अजूनही समाजाच्या एका वर्गात या संबंधात भरपूर अंधःश्रध्दा टिकून आहेत. काही आदिवासींमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळ्या झोपडीत जाऊन रहावे लागते आणि या काळात त्यांचे तोंड पाहणे हे सुध्दा पाप समजले जाते. महिलांना अशा रितीने अपवित्र, तोंडही न पाहण्याच्या लायकीच्या समजण्याची मानसिकता ही मध्ययुगीन मानसिकता आहे. दोन दिवसांपूर्वी केरळमधील एका मौलवीने महिला केवळ मुलांना जन्म देण्याच्या कामाच्या असतात, असे उद्गार काढले. त्यांची पुरुषांशी बरोबरी करणे कधीच शक्य नाही, तसा प्रयत्नही कोणी करू नये असे त्यांनी बजावले. या गोष्टी जुन्या काळातल्या आहेत.

आता काळ बदलला आहे आणि महिला शिकून पुरूषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करायला लागल्या आहेत. तरीसुध्दा अजून समाजातले बरेच लोक महिलांना हीन लेखतात. हे त्यांच्या अज्ञानाचे लक्षण आहे. शनी शिंगणापूरच्या कठड्यावर जाऊन त्याचे दर्शन घेण्याची अनुमती महिलांना नाही. ही प्रथा नेमकी कधी काळी पडली हे नक्की माहीत नाही परंतु ती अजूनही तशीच पाळली जाते. काळ बदलला तरी जुन्या रूढी तशाच पाळाव्यात अशी अजूनही काही लोकांची मानसिकता आहे. महात्मा जोतीबा फुले यांनी १५० वर्षांपूर्वी धर्मातल्या कालबाह्य रूढींच्या विरुध्द बंड पुकारले आणि अशा कालबाह्य रूढींचा फेरविचार करून त्या आता बदलल्या पाहिजेत असा विचार मांडला. कारण अनेक रूढी या गैरसमजानेही निर्माण झालेल्या असतात. अशा रूढींचा मागोवा घेतला असता त्या निर्माण होण्याचे कसलेच तर्कशुध्द आणि त्या काळाशी सुसंगत असेही कारण सापडत नाही. तसे काही असेल तर त्याची चर्चा करून त्या रूढींची हकालपट्टी झाली पाहिजे. शनी शिंगणापूरच्या मंदिरातली रूढी अशीच निरर्थक आहे. कारण भारतामध्ये अनेक ठिकाणी शनीची मंदिरे आहेत. पण त्यातल्या कोणत्याही मंदिरात महिलांना बंदी नाही.

शनीच्या मंदिरात बंदी असण्याची काही प्रथा असती तर ती सगळ्या शनी मंदिरात पाळली जायला हवी होती. मात्र तशी केवळ शिंगणापूरच्या शनी मंदिरातच का पाळली जावी हा प्रश्‍न आहेच. म्हणजे जुन्या रूढी पाळायच्या म्हटल्या तरी शिंगणापूरची महिलांवरची बंदी रूढीमान्य लोकांनाही मान्य होण्यासारखी नाही. मात्र तशी ती पाळली जाते. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच एका महिलेने या रूढीचा त्याग करून कठड्यावर जाऊन दर्शन घेतलेच. त्यामुळे परंपरावादी अज्ञानी लोकांमध्ये मोठी खळबळ माजली. खरे म्हणजे महिलांना कमी समजणे हेच मुळात तर्कशुध्द नाही. त्यांना अपवित्र मानणे हे तर त्याहूनही निषेधार्ह आहे. कारण महिलांना अपवित्र मानणारे पुरुष कोणा ना कोण्या बाईच्याच पोटी जन्माला आलेले असतात. मग बाई जर अपवित्र असेल तर तिच्या पोटी जन्म घेणारा पुत्र हा सुध्दा अपवित्रच समजला गेला पाहिजे. कारण तो तिचेच दूध पिऊन लहानाचा मोठा झालेला असतो. शनी शिंगणापूरच्या या रूढीच्या विरोधात पूर्वीही बराच गहजब झालेला आहे.

या गावात कोणी चोरी केली तर त्याला शनीच शिक्षा देतो अशी भावना आहे. ती चोरांनाही मान्य आहे. म्हणून ते चोरी करत नाहीत आणि म्हणून शिंगणापूरमध्ये घराला कडीकुलूप घातले जात नाही. ही रूढी एकप्रकारे आनंददायक असली तरी शेवटी ती अंधःश्रध्देपोटीच पाळली जात आहे. अशा देवस्थानाच्या ठिकाणी लोक गर्दी करतात. पैशाची उलाढाल वाढते आणि देवस्थानच्या कारभारात आर्थिक हितसंबंध निर्माण होतात. अशा ज्या लोकांची उपजीविका देवस्थानावर अवलंबून असते त्या लोकांना तिथले पुरातन नियम आणि कालबाह्य रूढी आहे तशा पाळल्या जाव्यात असे वाटत असते. कारण त्यामुळे देवस्थानचा महिमा टिकून राहत असतो. असे लोक या रूढींचा भरपूर गाजावाजा करतात आणि त्यांना शास्त्रीय आधार असल्याचे पटवून देत राहतात. म्हणूनच काल शनी शिंगणापूरमध्ये हा प्रकार घडताच गावातल्या लोकांनी आणि मंदिरात हितसंबंध निर्माण झालेल्यांनी बंद पाळला. खरोखर हिंदू धर्माच्या दृष्टीने ही अतीशय दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र या लोकांचे हे आर्थिक हितसंबंध इतके बळकट आहेत की त्यांना धर्माच्या सुधारणांशी काही देणेघेणे नाही. शनी शिंगणापूर हे एक छोटेसे गाव होते पण गेल्या पंचवीस वर्षात त्याचा गवगवा वाढून या गावातली वार्षिक उलाढाल ३२ कोटींवर गेली आहे. अशा लोकांना रूढी मोडल्याचे वैषम्य वाटणारच.

Leave a Comment