नक्कल अंगलट आली

rahul-gandhi
भाषण करताना कोणाची नक्कल करू नये. आपण आपल्याच शैलीत भाषण करावे. दुसर्‍याची नक्कल करण्याचा प्रयत्न केल्यास ती नक्कल अंगलट येते. राहुल गांधी यांनी काल नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आणि बंगळुरुच्या एका महिला महाविद्यालयात दिलेल्या भाषणात श्रोत्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. समोरचे श्रोते आपल्याशी सहमत आहेत की नाही याची खातरजमा न करता लोकांकडून काही उत्तरे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु समोरचे श्रोते हे काही सामान्य नव्हते. त्या बंगळुरुच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांना सपशेल तोंडावर पाडले. राहुल गांधींनी व्यासपीठावरून काही प्रश्‍न विचारावेत आणि श्रोत्यांनी माना डोलवून त्या प्रश्‍नाचे त्याला हवे ते उत्तर द्यावे अशी राहुल गांधींची अपेक्षा होती. तिच्या मागे श्रोत्यांना गृहित धरण्याची त्यांची प्रवृत्ती त्या मुलींना दिसली आणि त्यांनी राहुल गांधींना चांगलाच धडा शिकवला. भाषण करताना इतरांची नक्कल करू नये हा धडा राहुल गांधी नक्कीच शिकले असतील. राहुल गांधी हे भाषणाच्या क्षेत्रात आता हळूहळू एकेक पाऊल टाकत आहेत. त्यांच्या या उमेदवारीमध्ये हा धडा नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

बिहार विधानसभेत कॉंग्रेस पार्टीने ४१ जागा लढवून त्यातल्या २७ जागा जिंकल्या आणि महाआघाडीत सामील होऊन आपली या विधानसभेतली सदस्य संख्या चार वरून २७ पर्यंत वाढवली. या निकालाने राहुल गांधी यांना आभाळाला हात टेकल्यागत वाटायला लागले आहे. त्यातल्या त्यात भाजपाची मस्ती जिरवण्यास कारणीभूत ठरलेली ही आघाडी राहुल गांधी यांच्याच प्रेरणेने संघटित झाली असल्याचे वातावरण कॉंग्रेसच्या नेत्यांनी निर्माण करायला सुरूवात केली आहे त्यामुळे राहुल गांधी राष्ट्रीय नेते झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. बंगलोरमधील या भाषणात त्यांनी भाजपा सरकारवर टीका करायला सुरूवात केली. एकतर त्यांनी या महाविद्यालयात शिक्षणावर भाषण करायला हवे होते पण त्यांना राजकीय भाषण करण्याचा मोह आवरता आला नाही. शिवाय त्यांनी शिक्षणावर आणि महिलांच्या प्रश्‍नांवर बोलावे एवढी त्यांची बौद्धीक कुवतही नाही. भाजपा सरकारसमोर काही निश्‍चित धोरण नाही, पंतप्रधान मोदी एकटेच सारे निर्णय घेतात, मेक इन इंडिया हा बोगस कार्यक्रम आहे, स्वच्छ भारत मोहिमेचे तर कामही सुरू नाही अशी त्यांनी नेहमीचीच टकळी लावली. ती तर त्यांनी बिहारच्या निवडणुुकीत लावलेली होतीच मग मुलींना त्या भाषणाचे आकर्षण कसे वाटणार असा विचारही त्यांनी केला नाही.

तसा विचार केला नसता तरी भागले असते पण ते मोेदी स्टाईलने श्रोत्यांशी संवाद साधायला लागले. त्यांनी श्रोत्यांतल्या मुलींना काही प्रश्‍न विचारले पण त्यांची त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे आलीच नाहीत. स्वच्छ भारतची कामे सुरू आहेत का, असा सवाल त्यांनी केला तेव्हा त्यांना नाही असे उत्तर अपेक्षित होते पण झाले उलटेच. मुलींनी होय असे उत्तर दिले. हा प्रकार त्यांना अनपेक्षित होता. बिहारच्या निवडणुकी पासून त्यांनी त्यांच्या मनाचा असा ग्रह करून घेतला आहे की आता देशातली मोदी लाट ओसरली आहे आणि आपण मोदींची थट्टा करायला लागलो तर लोक आपल्याला हवा तसा प्रतिसाद देतील. पण त्यांचा अंदाज चुकला. तरुणांच्या मनात मोदींविषयी अजूनही आकर्षण आहे, ते अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही करीत आहेत असा त्यांचा विश्‍वास आहे. त्यामुळे राहुल गांधीना अपेक्षित प्रतिसाद मिळेनासा झाला. हा सारा प्रसंग त्यांना अनपेक्षित होता पण त्यातून कसे सावरावे हे त्यांना कळेना. हा पेचप्रसंग हाताळण्याचा वकूब त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रश्‍नोत्तराचा खेळ थांबवून सरळ भाषण करायला हवे होते पण ते अधिकच अडकत गेले.

त्यांनी मेक इन इंडियावर असाच प्रश्‍न विचारला आणि त्यावर मुलीनी त्यांची टरच उडवली. नंतरच्या प्रश्‍नोत्तरात मुलींनी राहुल गांधी यांच्या सुटबुटवाले सरकार या युक्तिवादावर प्रश्‍न विचारून त्यांना निरुत्तर केले. सुट बुट घालणारा माणूस चांगले काम करीत असेल तर त्याच्या केवळ कपड्यांवर टीका करणे योग्य आहे का ? या प्रश्‍नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. राहुल गांधी सध्या पायजमा आणि कुडता घालून फिरत आहेत आणि आपण या वेषाने शेतकर्‍यांना आकृष्ट करू शकू असे त्यांना वाटत आहे. पण काल ते अंगात टी शर्ट घालून गेले होते. आजवर त्यांनी कधीही जाहीर कार्यक्रमांत असा वेष परिधान केला नव्हता. त्यांच्या दृष्टीने वेषाचा काही संकेत असेल तर त्यांचा हा वेष चुकला होता कारण ते कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. काल त्यांना पूर्ण तयारी करून घेऊन या कार्यक्रमाला पाठवण्यात आले होते. आता त्यांचे भाषण सुधारत आहे असा दावा कॉंग्रेसचे नेते करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांची या कार्यक्रमातली कामगिरी कशी होईल याबद्दल त्यांच्या अनुयायांत उत्सुकता होती. ते न घाबरता आणि सहजपणे बोलले यात काही शंका नाही पण उद्याचा पंतप्रधान म्हणून घेणारा नेता केवळ बोलला ही काही कौतुकाची बाब नाही. त्याची प्रश्‍नोत्तरातली तयारी कशी होती आणि त्यात त्याचा व्यासंग दिसून आला का ही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा कार्यक्रमात त्यांना निरुत्तर व्हायला नको होते. पण ते अनेक प्रश्‍नांवर निरुत्तर झाले आणि काही प्रश्‍नांवर तर गडबडून गेले.

Leave a Comment