आता आमीर खानचे नाटक

aamir-khan
कर्नाटकातील कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांनी लोकसभा निवडणुका जारी असतानाच्या काळात, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडून जाऊ अशी वाचाळ वल्गना केली होती. नरेंद्र मोदी तर पंतप्रधान झाले पण अनंतमूर्ती अजूनही भारतात आहेत. आता त्यांचे भारतात राहणे हे निलाजरेपणाचे लक्षण आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या द्वेषाने पछाडलेल्या अशा लोकांना लाज नसतेच कदाचित अनंतमूर्ती यांनी भारत देश सोडून कोणत्या देशात जाऊन राहावे याची चाचपणी केली असेल आणि त्यांना भारतासारखा सहिष्णु देश कोठे नाही याचा पडताळा आला असावा. अर्थात असा पडताळा आला असला तरी तसे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्यात नाहीच. आता त्यांच्या मांदियाळीमध्ये आमीर खानची भर पडली आहे. त्याने काल एका समारंभात बोलताना आपल्या पत्नीने भारत देश सोडून इतरत्र जाऊन राहण्याची कल्पना बोलून दाखवली होती असे सांगितले. आमीर खान आणि त्याची पत्नी यांना भारतातल्या कोणत्या असहिष्णु शक्तीचा कसा त्रास झाला होता किंवा होण्याची शक्यता होती याचा कसलाही खुलासा आमीर खाननेही केला नाही आणि त्याच्या पत्नीनेही केलेला नाही.

याचा अर्थ भारतात असहिष्णु वातावरण असल्याचा मतलबी प्रचार करणार्‍या लोकांच्या मांदियाळीतच आमीर खानसुध्दा जाऊन बसलेला आहे. सध्या देशामध्ये असहिष्णुतेच्या कथित वातावरणाच्या निमित्ताने पुरस्कार वापसी, निषेध आदी घटना होत आहेत आणि या पार्श्‍वभूमीवरच आमीर खानचे हे निवेदन समोर आले. पुरस्कार वापसीच्या काही मतलबी लोकांच्या प्रचारकी थाटाच्या खोटारड्या मोहिमेला आमीर खानने एकप्रकारे अप्रत्यक्ष का होईना पण दुजोरा दिला. विसंगती अशी की, त्याने हे सत्य कथन एका पुरस्कार समारंभातच केले. आमीर खानच्या या उद्गाराला राजकीयदृष्ट्या बरेच महत्त्व आले. देशातल्या विचार करणार्‍या लोकांपुढे आमीर खानला एक स्थान आहे. मात्र स्थान आहे याचा अर्थ तो फार मोठा विचारवंत आहे असा होत नाही. कारण त्याने सरदार सरोवराच्या बाबतीत घेतलेली भूमिका फार काही परिपक्वपणाची नव्हती आणि आताही त्याने या देश सोडून जाण्याच्या निवेदनाबद्दल बोलताना आपण तेवढे परिपक्व नसल्याचेच दाखवून दिले आहे. आमीर खान याने स्वतः देश सोडून जाण्याची भाषा केली नाही मात्र आपली पत्नी तसे म्हणत होती असे सांगितले आहे. म्हणजे प्रश्‍न नेमका विचारात घ्यायचा तर आमीर खानच्या हिंदू पत्नीला भारत देश सोडून दुसर्‍या देशात रहावे असे वाटावे एवढे खरेच असहिष्णुतेचे वातावरण या देशात आहे का असा घ्यावा लागेल.

देशातल्या तथाकथित असहिष्णुतेच्या वातावरणाचा पुरोगामी शिमगा बराच रंगला आणि बिहारच्या निवडणुका झाल्याबरोबरच तो शांतही झाला. मात्र आमीर खानला पुन्हा हे शिमग्यानंतरचे कवित्व का सुचले काही समजत नाही. भारतामध्ये असे कित्येक मुस्लीम आहेत की जे मोठ्या कंठरवाने संागत आहेत की मुस्लीम समाजाला राहण्यासाठी भारतासारखे सुरक्षित स्थान जगात अन्यत्र कोठेही नाही. भारतातले मुस्लीम या देशातले हिंदू कमालीचे सहिष्णु असल्यामुळे शांततेने जगू शकतात आणि जगत आहेत. भारतातल्या मुस्लिमांना ही सहिष्णुतेची वागणूक देताना भारतातले हिंदू त्यातला शिया मुस्लीम कोण आहे आणि सुन्नी मुस्लीम कोण आहे याचा विचार करत नाहीत. आमीर खानच्या पत्नीला दुसर्‍या कोणत्या देशात राहायचे होते हे माहीत नाही परंतु या देशात भरपूर पैसा कमवून परदेशी जाऊन राहण्याची दुर्बुध्दी सुचणार्‍या अशा लोकांना अमेरिका किंवा ब्रिटन हे देश सुरक्षित वाटत असतात. त्यातल्या त्यात चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना पॅरिसचेही आकर्षण वाटते. मात्र यूरोप आणि अमेरिकेत मुस्लिमांसाठी सुरक्षित वातावरण नाही हे आमीर खानच्या पत्नीला माहीत नसावे.

अमेरिकेत मुस्लीम समाजाला कशी वागणूक मिळत आहे याचा अनुभव शाहरूख खानने अमेरिकेतल्या एका विमानतळावर घेतलेलाच आहे. शिवाय सातत्याने हिंदू विरोधी वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशातले समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनाही अमेरिकेतल्या मुस्लीमविरोधी वातावरणाचा फटका एकदा बसला. एवढेच नव्हे तर एपीजे अब्दुल कलाम यांनाही अशी वागणूक मिळालेली आहे आणि यूरोप खंडात तर मुस्लीमविरोधी हिंसाचाराला मोठी चालना मिळायला लागली आहे. तेव्हा आमीर खान आणि त्याची पत्नी भारतापेक्षाही अमेरिकेत आणि यूरोपात अधिक असुरक्षित राहिले असते. अर्थात त्यांच्यासमोर पश्‍चिम आशियातील श्रीमंत देशही असू शकतात. असे असले तरी आज जगात खरोखरच भारताएवढा मुस्लिमांसाठी सुरक्षित असलेला दुसरा कोणताही देश नाही. मात्र काही मुस्लीम तरुण अतिरेकी धर्मभावनेच्या आहारी जाऊन इसिससारख्या संघटनेत सामील होतात. तिथेही भारतीय मुस्लिमांना कमी दर्जाचे मुस्लीम मानले जाते. अन्य काही देशांमध्ये सुन्नी मुस्लीम हे शियांना मुस्लीमच मानत नाहीत. इसिसमध्ये सामील होणार्‍या भारतीय तरुणांना केवळ मानवी बॉम्ब म्हणून वापरले जाते. याचा बोध आमीर खान आणि त्याच्या पत्नीने घेतला पाहिजे.

Leave a Comment