अय्यर नावाच्या सापाचे फुत्कार

manishankar
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करणार्‍या काही खास लोकांमध्ये मणिशंकर नावाचा एक विषारी वृत्तीचा माणूस अग्रभागी बसलेला दिसतो. ते कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली किंवा त्यांचे दोष दाखवले तर त्यात काही चूक नाही. पण दोष दिग्दर्शन आणि द्वेष याच्यामध्ये एक सूक्ष्म सीमारेषा असते. एखाद्या व्यक्तीचे दोष खरोखरच प्रामाणिकपणे जगासमोर आणायचे असतील तर त्या दोषावरच प्रहार केला जातो आणि तो तर्कशुध्द असतो. त्यामध्ये व्यक्तीपेक्षा दोषावर भर दिलेला असतो आणि व्यक्तीवर टीकाटिप्पणी केलेली नसते. द्वेषामध्ये मात्र दोषापेक्षा व्यक्तीचा हेवा हेच लक्ष्य असते आणि तो प्रकट करण्यामध्ये तर्कशुध्दताही नसते. अशा द्वेषाच्या प्रकटीकरणाने ज्याच्याविषयी द्वेष व्यक्त केला जातो त्याच्याविषयी समाजात रोष निर्माण होण्याऐवजी द्वेष करणार्‍याविषयीच रोष निर्माण होतो आणि त्याचे हसे होते. असा सातत्याने द्वेष करण्यातून तो व्यक्त करणार्‍याची मानसिक विकृतीच समाजासमोर येत असते.

कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या द्वेषाची एवढी परमावधी गाठली आहे की त्यांना द्वेष प्रकट करताना देशाचीही तमा वाटेनाशी झाली आहे. मणिशंकर अय्यर हे भारताच्या परराष्ट्र खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे काय बोलावे आणि कसे बोलावे याचे तारतम्य त्यांना असणारच. ते एका इंग्रजी साप्ताहिकामध्ये स्तंभलेखनही करत होते. परंतु मोदींचा विषय समोर येताच त्यांचे सारे तारतम्य लयाला जाते आणि ते काहीतरी विचित्र विधान करून बसतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना उघडपणे विरोध केला. पक्षीय राजकारणाचा एक भाग म्हणून ते समर्थनीयही होते. परंतु मणिशंकर अय्यर हे एकमेव कॉंग्रेस नेते निघाले की ज्यांना मोदींविषयी बोलताना आपल्या मेंेदूवर ताबा ठेवता आला नाही. नरेंद्र मोदी हे चहा विक्रेते आहेत आणि असा खालच्या दर्जाचा व्यवसाय करणारा हा माणूस भारताचा पंतप्रधान होऊ इच्छितो. त्याला भारताला पंतप्रधान होणे तर शक्यच नाही. फार तर या निवडणुका संपल्यानंतर आपण त्याला कॉंग्रेसच्या कार्यालयातील कॅन्टीनचा मक्ता फार तर देऊ असे अय्यर बरळले. या म्हणण्यामध्ये तर्कशुध्दता कोठे होती हे काही समजत नाही. मोदी चहावाले होते आणि चहा विकता विकता इतर काहीही न करता ते पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर डोळा लावून बसले होते असे काही नव्हते.

ते चहावाले असूनही गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बारा वर्षे कार्यरत होते. तेव्हा मणिशंकर अय्यर यांचा युक्तिवाद हा त्यांच्या मानसिक विकृतीचाच एक भाग होता. लोकशाहीमध्ये विरोधकांची हेटाळणी केली जाऊ शकते पण तिला सभ्यतेच्या मर्यादा असाव्यात. अय्यर काहीही बरळले तरी मोदी पंतप्रधान झालेच. कॉंगे्रसच्या कार्यालयात चहाचा मक्ता घ्यायला कोणीच पुढे सरसावले नाही. कारण कॉंग्रेसचा एवढा दारूण पराभव झाला की कॉंग्रेसच्या कार्यालयात इतर कोणी तर सोडाच पण कॉंग्रेसचे कार्यकर्तेसुध्दा फिरकेनासे झाले. अय्यर यांचा असा पचका झाल्यामुळे तर त्यांच्या डोक्यातला मोदीद्वेष नशेत परिवर्तित झाला. आता तर ते कोणत्याही गोष्टीचा संबंध कारण नसताना मोदींशी जोडत आहेत. पण विरोधी गरळ ओकण्याचे आपले सत्र काही थांबवत नाहीत. नुकतीच एका पाकिस्तानी वाहिनीला दिली मुलाखत दिली. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुरळीत करायचे असतील तर मोदींना पंतप्रधान पदावरून हटवावे लागेल असे अतार्किक विधान त्यांनी केले. द्वेषाला कधीच तर्काचा आधार नसतो. त्यामुळे अय्यर असे बोलले असले तरी त्यांच्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे.

मणिशंकर अय्यर हे परराष्ट्र संबंधातले तज्ञ आहेत. पण त्यांना भारत-पाक संबंधांविषयी तर्कशुध्द विधान करता आले नाही. कारण इकडून ना तिकडून मेळ घालून कसे तरी मोदींचे नाव गुंतवणे हाच त्यांचा धंदा होऊन बसला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुरळीत करण्यासाठी भारतामध्ये सत्तांतर होण्याची गरज नाही तर ती पाकिस्तानमध्ये होण्याची गरज आहे. भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध बिघडतील असे काहीही केलेले नाही. उलट भारतीय जनता पार्टीचे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना सगळा मोठेपणा बाजूला ठेवून स्वतःहून निमंत्रण नसताना बस घेऊन पाकिस्तानला गेले होते. नरेंद्र मोदी यांनीही भारताचे पाकिस्तानशी संबंध बिघडतील असे एकही कृत्य केलेले नाही आणि तसे त्यांच्या कोणत्याही कट्टर शत्रूला दाखवता आलेले नाही. इंदिरा गांधी या कॉंग्रेसच्या नेत्या होत्या. त्या पंतप्रधान होत्या. त्या काळात त्यांनी पाकिस्तानची दोन छकले केली. कोणत्याही राष्ट्रभक्त भारतीयाला याचा अभिमानच वाटेल. परंतु भारतीयत्वाचा अभिमान गुंडाळून ठेवून बोलायचे झाले तर पाकिस्तानचा पराभव करण्यात इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्री हे आघाडीवर होते. मोदींनी पाकिस्तानला कधीच छेडलेले नाही. परंतु त्यांनी कॉंग्रेसचा मात्र धोबीपछाड डाव टाकून पराभव केलेला आहे. त्याची सल अय्यर यांच्या मनात असणे सहाजिक आहे. परंतु ती व्यक्त करताना देशाचा अपमान करता कामा नये. एवढेही भान त्यांना राहिलेले नाही.

Leave a Comment