आझम खान यांची स्पष्टोक्ती

ajam-khan
सीरिया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या इसिस या संघटनेने पॅरिसवर केलेल्या हल्ल्यात दीडशेपेक्षाही अधिक लोक मारले गेले आहेत आणि या हल्ल्याचा जगात सर्वत्र निषेध केला जात आहे. सारे सुसंस्कृत जग पॅरिसच्या बाजूने आणि सार्‍या दहशतवादी शक्ती इसिसच्या बाजूने असे चित्र निदान सुरूवातीच्या काळात तरी तयार झालेले दिसत आहे आणि प्रसार माध्यमे दहशतवाद्यांच्या विरोधात असल्यामुळे सार्‍या जगामध्ये इसिसच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, भारत, फ्रान्स, ब्रिटन, तुर्कस्तान आदी बहुतेक देशातल्या शासकांनी तर फ्रान्सच्या बाजूने आपले मत व्यक्त केलेेले आहे. निदान आताच्या अवस्थेत तरी सारे जग पॅरिसच्या मागे उभे आहे.

असे असतानाच उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी आपले वेगळे मत व्यक्त केले आहे. अशा प्रकारे वेगळे मत व्यक्त करणे हे आझम खान यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिपादनाकडे कुचेष्टेने पाहिले जाऊ शकते आणि तशी मते काही लोकांनी व्यक्तही केली आहेत. दहशतवाद्यांनी पॅरिसवर हल्ला केला असला तरी हा हल्ला आपल्यावर का झाला याचा विचार फ्रान्ससारख्या देशांनी करावा असे आझम खान यांचे म्हणणे आहे. हल्ल्यांची सुरूवात काही इसिसने केलेली नाही. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांनी आपल्या पेट्रोलविषयक स्वार्थासाठी पश्‍चिम आशियातल्या आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशामध्ये सातत्याने संघर्ष पेटता ठेवला आणि त्या संघर्षात अनेकांचे बळी गेले.

पाश्‍चात्य देशांच्या या राजकारणाच्याच प्रतिक्रिया पॅरिससारख्या घटनांमधून उमटत आहेत. अशा घटनांमध्ये बळी पडलेल्या निरपराध लोकांविषयी हळहळ व्यक्त केली जाते आणि ती एका अर्थाने खरी आहे. परंतु पाश्‍चात्य देशांनी आशियाई देशामध्ये आपल्या स्वार्थासाठी किती अशा निरपराध लोकांचे बळी घेतलेले आहेत. याची मात्र यावेळी कोणी आठवण काढत नाही. असे आझम खान यांचे म्हणणे आहे आणि त्यात तथ्य आहे. किंबहुना अशाच प्रकारची प्रतिक्रिया पूर्वी २००१ साली झालेल्या अमेरिकेतल्या स्फोटांच्या प्रसंगीही व्यक्त करण्यात आली होती. आझम खान यांचा युक्तिवाद योग्य असल्याचे वाटते परंतु पाकिस्तानमधले अतिरेकी भारतामध्ये अशा घातपाती घटना घडवतात तेव्हा त्यांना कोण जबाबदार असते? आज भारत-पाक सीमेवरच्या कित्येक खेड्यामधल्या लोकांना सातत्याने गोळीबाराच्या सावटाखाली जगावे लागते. या लोकांनी पाकिस्तानचा काय गुन्हा केलेला आहे, याचे उत्तर आझम खान देतील का?

Leave a Comment