ऍटमबॉंब आणि भुईनळे

combo
दिवाळी प्रमाणेच निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही फटाके उडत असतात आणि त्यामुळे पक्षातले वातावरण प्रदूषित होत असते. भारतीय जनता पार्टीत त्याला अपवाद कशी असेल? बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासूून भाजपातही नवनवे फटाके उडायला लागले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्याला भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले असते तर भाजपाला यश मिळाले असते असा फुसका फटाका उडवला आहे. या नटरंग्याचे राजकीय, प्रशासकीय किंवा सांसदीय कर्तृत्व काय असा प्रश्‍न विचारला तर एखादेही सकारात्मक उत्तर मिळत नाही. त्याला हरबर्‍याच्या झाडावर चढवायलाही कोणी तयार होत नसते. पण त्याने स्वत:च हरबर्‍याच्या झाडावर चढायला सुरूवात केली आहे. मागे एकदा त्यांनी स्वत:च वाजपेयी मंत्रिमंडळात आपली वर्णी लावून घेतली होती पण तिथे त्याला काहीही करता आले नाही. आता शत्रुघ्न सिन्हा म्हणून कोणी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते का असा प्रश्‍न विचारला तर खुद्द शत्रुघ्न सिन्हासह कोणालाही काही आठवत नाही.

त्याने वैयक्तिक एक फटाका फोडला पण अशाच संधी नाकारल्या गेलेल्या काही बजुर्गांनी सामूहिक फटाका फोडला. बिहारच्या पराभवाला नरेन्द्र मोदी आणि अमित शहा या दोघांना जबाबदार धरले जावे अशी मागणी या जुन्या जाणत्या नेत्यांनी आडून आडून गेली. नरेन्द्र मोदी हे नाव घेताच ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात अशा काही पत्रकारांनी या जुन्या फटाक्याला ऍटमबॉंबची उपमा दिली. या फटाक्याची बातमी वाचण्याच्या आधीच एखाद्या सामान्य माणसाला हे बजुर्ग कोण असा अंदाज करायला लावला असता तर कोणीही अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी ही नावे चटकन घेतली असती. ती बरोबरही आहेत. पण आता या दोघांंत यशवंत सिन्हा आणि शांताकुमार ही दोन नावे दाखल झाली आहेत. भाजपाचा बिहारमध्ये झालेला पराभव हा काही फार अघटित झालेला नाही. तिथे भाजपाचे काही सरकार नव्हते पण या निमित्ताने मोठ्या तोफा उडवण्यात आल्याने या निवडणुकीला जादा महत्त्व आले आणि पराभवाला जबाबदार कोण याच्या चर्चेचे रामायण सुरू झाले. पण खरेच अडवाणी यांनी एवढ्या गांभीर्याने अशी चर्चा करावी एवढी ही निवडणूक महत्त्वाची होती का याचा विचार करण्याची गरज आहे. या चौघांत के. गोविंदाचार्य हे एक पात्र आहे पण त्यांनी तूर्तास तरी स्वत:ला या वादापासून दूर ठेवले आहे. चार बुजुगार्र्ंच्या या निवेदनावर आता उलट सुलट विधाने केली जात आहेत.

या लोकांच्या विधानाचा अन्वयार्थ काय असा प्रश्‍न मनात येतोच पण काही वेळा कोण काय बोलते यापेक्षा ‘का’ बोलते याला जादा महत्त्व असते. म्हणून अडवाणी यांनी हा कथित बॉंब का टाकला याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही चारही बुजुर्ग नेते मंडळी बाजूला फेकली गेली आहेत. त्यांना मोठी राजकीय भूमिका हवी होती. वयाची आठ दशके संपली तरीही त्यांच्या पदाच्या लालसा कमी झाल्या नव्हत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून ते नाराज आहेत आणि त्या नाराजीपोटी ते असे बॉंब फोडायला लागले आहेत. गंमतीचा भाग असा की एरवी अडवाणी यांना सर्वाधिक धोकादायक हिंदुत्ववादी नेता मानणार्‍या समाजवादी नेत्यांना आणि कॉंग्रेसवाल्यांनाही अडवाणी यांचा उमाळा यायला लागला आहे. भाजपाच्या गोटात २०१२ पूर्वी अडवाणी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घेतले जात होते तेव्हा काही पत्रकार त्यांच्या वयावरून त्यांची चेष्टा करीत होते. तरणेबांड राहुल गांधी आणि ८७ वर्षांचे अडवाणी यांच्यात चुरस झाल्यास या देशातली जनता राहुल गांधी यांनी पसंती देईल अशी भविष्यवाणीही हे पत्रकार वर्तवीत होते. पण आता मात्र त्यांना मोदीनी अडवाणीसारख्या अनुभवी नेत्याला अडगळीत टाकल्याचा राग आला आहे.

या चार नेत्यांची ही नाराजीतून निर्माण झालेली पिरपिर आहेच पण नितीशकुमार हे अडवाणींचे आवडते नेते आहेत. भाजपात मोदी की अडवाणी असा वाद जारी असताना नितीशकुमार हे आपले वजन अडवाणी यांच्या पारड्यात टाकत होते आणि मोदी यांना पुढे केले जाऊ नये असा दबाव भाजपावर टाकत होते. अर्थात मोदी यांचे नाव जाहीर झालेच. त्यावर अडवाणी आणि नितीशकुमार या दोघांना सर्वात अधिक वाईट वाटले. लोकसभा निवडणुकीच्या आधी अडवाणी यांचे एक वेगळे समीकरण होते. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीतर अन्य मित्र पक्षातल्या कोणाला तरी पंतप्रधान करावे लागेल असा त्यांचा अंदाज होता. तो अन्य पक्षातला उमेदवार नितीशकुमार हा होता. असे या दोघांचे साटेलोटे होते. मोदी हे अडवाणी यांचे आतले शत्रू झाले आहेत तर नितीशकुमार हे बाहेरचे. आता अडवाणी यांनी हा ऍटमबॉंब फोडल्यावर पक्षातून त्यांना प्रत्युत्तर दिले जायला लागले आहे. नितीन गडकरी यांनी त्यांना उत्तर दिले असून, मागे अडवाणी यांच्याही नेतृत्वाखाली अनेक निवडणुका हरलेल्या आहेत याची त्यांनी आठवण करून दिली आहे. यावरून अडवाणी आता बुजुर्ग नेते म्हणून असलेले आपले स्थान गमावत चालले आहेत असे दिसून येते. त्यांनी आता गप्प बसून आपला मान ठेवून घेतला पाहिजे किंवा भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.