
बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याबरोबर काही माध्यमांना आणि विश्लेषकांना मोठा बहर आला होता. मोदींची मस्ती जिरली म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. नितीशकुमार विजयी झाले, लालूप्रसादाची सरशी झाली. कॉंग्रेसची संख्या वाढली आणि मोदींचा पराभव झाला. एवढ्या प्राथमिक माहितीची नशा या विश्लेषकांना अशी काही चढली होती की तिच्या नशेत मोदींची प्रत्येक गोष्ट चुकली आणि लालू, नितीश जोडीची प्रत्येक गोष्ट बरोबरच होती असे विश्लेषण त्यांनी करून टाकले. ते विश्लेषकही धन्य झाले आणि ऐकणारे श्रोतेही त्यात मग्न झाले. पण आता तपशीलात विश्लेषण सुरू झाले आहे आणि सकृतदर्शनी हाती आलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या मर्यादा आता ध्यानात यायला लागल्या आहेत. त्यातल्या त्यात नितीशकुमार यांच्या पर्यायी नेतृत्वाचा ज्वर आता ओसरायला लागला आहे.
विश्लेषणांचे रामायण
कारण नितीशकुमार हे विकासपुरुष ठरले असले तरी त्यांच्या चाव्या लालूप्रसाद यादव यांच्या हातात आहेत यामुळे काय होणार असा प्रश्न सर्वांना भेडसवायला लागला आहे. कारण लालूप्रसाद ही काय चीज आहे हे आपल्याला तर माहीत आहेच पण नितीशकुमार यांना तर ते चांगलेच माहीत आहे. परिणामी लालूंंच्या लीला नितीशकुमार यांना कशा कशा सहन कराव्या लागतील यावर चर्चा सुरू झाली आहे. लालूप्रसाद यादव हे मोठे महत्त्वाकांक्षी गृहस्थ आहेत आणि त्यामुळेच तर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांचे मार्ग भिन्न झाले होते. आता तर या दोन तलवारी एकाच म्यानामध्ये बसतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. नितीशकुमार यांना मानणारा एक वर्ग आता एका प्रश्नाने सचिंत झाला आहे की नितीशकुमार यांचा अवकाश गिळण्यासाठी लालूप्रसाद काय काय करतील?
हा तर प्रश्न बिहारपुरता मर्यादित आहे. पण मोदींची मस्ती जिरवण्याचे खरे श्रेय कोणाचे यावरून या दोघांमध्ये राष्ट्रीय पातळीवरचा एक सूप्त संघर्ष निर्माण होण्याची शक्यता खास समाजवादी विचारांच्या लोकांनाही आतापासूनच डाचायला लागली आहे. कारण दोघांनाही मोदींचा राष्ट्रीय पर्याय म्हणून उभे राहण्याच्या महत्त्वाकांक्षेने ग्रासलेले आहे. वास्तविक राष्ट्रीय पर्याय होण्याची क्षमता या दोघांहीमध्ये नाही. परंतु त्यावरून त्यांचा संघर्ष मात्र होणारच आहे. कारण तसा तो मुलायमसिंग यादव यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत सर्व तिसर्या आघाडीच्या नेत्यांमध्ये गेल्या २० वर्षांपासून सूप्त स्वरूपात सुरू आहे. त्या संघर्षामुळेच देशात तिसरी शक्ती उभी राहिलेली नाही. मात्र हे वास्तव माहीत असूनही लालू आणि नितीश हे एकमेकांवर कडी करण्याचा प्रयत्न केल्याविना राहणार नाहीत. तसा तो सुरू झाला की नितीशकुमार यांना भाजपाबरोबर असलेली युती त्यामानाने सुखावह होती. याची आठवण झाल्याविना राहणार नाही.
