सौदीतील आतंक

saudi-arebia
सौदी अरबस्तान, कुवेत, दुबई या पश्‍चिम आशियातील देशात मोठी समृध्दी असल्यामुळे दक्षिण भारतातून बर्‍याच महिला तिकडे नोकरीसाठी जातात. पश्‍चिम आशियात गेलेल्या परिचारिकांची अवस्था काय झाली हे गतवर्षी आपल्या लक्षात आलेच आहे. परंतु तामिळनाडू आणि केरळमधील अनेक अशिक्षित महिला तिकडे घरकामाच्या नोकर्‍यासाठी जातात तेव्हा त्यांची अवस्था परिचारिकांपेक्षा अवघड होते. परिचारिकांना तिकडे पाठवणार्‍या एजन्सीज संघटित असतात, नोंदलेल्या असतात आणि त्यांच्या मार्फत जाणार्‍या परिचारिका सुशिक्षित असतात. तिथे गेल्यानंतर त्या समुदायाने राहतात. त्यामुळे त्यांच्या कामात आणि त्यांना मिळणार्‍या वागणुकीत काही अडचणी तर त्यांना दाद मागता येते. परंतु मोलकरीण म्हणून तिकडे जाणार्‍या महिलांची अवस्था फारच वाईट होते.

सौदी अरबस्तानामध्ये मोलकरीण म्हणून गेलेल्या तामिळनाडूमधील कस्तुरी मणिरत्नम या महिलेवर गुदरलेला प्रसंग फारच विचार करायला लावणारा आहे. एका एजन्सीच्यामार्फत ती तिकडे एका श्रीमंत कुटुंबात मोलकरीण म्हणून गेली. पण तिला फार वाईट वागणूक मिळाली. एकेदिवशी तामिळनाडूचे काही लोक तिकडे आल्याचे तिला कळले तेव्हा त्यांना भेटून आपली करुण कहाणी सांगावी याकरिता ती त्यांना भेटण्यास निघाली पण तिला परवानगी नाकारण्यात तर आलीच पण तिचा डावा हात शिक्षा म्हणून कलम करण्यात आला.

या महिलेने शेवटी कसेबसे पलायन केले आणि ती भारतात परत आली. तेव्हा तिला वैद्यकीय मदत मिळाली. तिचा आणखी एक हात तोडला जाणार होता पण धाडसाने पळून आल्याने तो हात वाचला. तिला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मुख्यमंत्री निधीतून १० लाखांची मदत मंजूर केली आहे. ही अशिक्षित महिला आता सावरत आहे. परंतु त्यांना परदेशी पाठवणार्‍या अशा मध्यस्थांना आळा घालण्याबाबत काहीतरी उपाय केला गेला पाहिजे हे लक्षात आले. अशा प्रकरणातून शेवटी एक प्रश्‍न निर्माण होतो की कसलेही संरक्षण नसताना या महिला अनोळखी एजंटाच्यामार्फत अनोळखी कुटुंबामध्ये जातात तरी कशाला? या प्रश्‍नाचे उत्तर आहे या महिला कुटुंबावरील कर्जामुळे जेरीस आलेल्या असतात. भारतात त्यांना जेवढे पैसे मिळू शकतात त्याच्या कितीतरी जास्त पैसे तिकडे मिळतात आणि तिकडे जाऊन काही वर्षे काम केल्यास कुटुंब कर्जातून मुक्त तरी होईल म्हणून त्या तिकडे जाण्यास प्रवृत्त होतात.

Leave a Comment