तलाक पीडितांची दुरवस्था

talak
मुस्लीम समाजामध्ये कोणताही पुरुष आपल्या पत्नीला तलाक, तलाक, तलाक असे तीनवेळा म्हणून घटस्फोट देऊ शकतो. या तरतुदीचा गैरफायदा काही मुस्लीम पुरुष घेतात आणि किरकोळ कारणावरून बायकोचा त्याग करतात. त्यामुळे तलाक पीडित महिलांचे जीवन फार हलाखीचे होते. या महिलांच्या स्थितीचा अभ्यास भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या स्वयंसेवी संघटनेने केला आहे. मुस्लीम महिलांना तोंडी तलाकमुळे होणार्‍या दुरवस्थेची चांगली जाणीव असते. त्यामुळे या संघटनेच्या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की, ९२ टक्के मुस्लीम महिला तोंडी तलाक देण्याच्या रूढीच्या विरोधात आहेत. विशेषतः एकतर्फी तलाक देणे हे इस्लामला मान्य असले तरी त्याचा अवलंब केला जाऊ नये असे बहुसंख्य महिलांचे मत आहे.

मध्यंतरीच्या काळात तोंडी तलाक देण्याच्या पध्दतीविरुध्द मुस्लीम समाजातच आवाज उठवण्यात आला. काही मुस्लीम अभ्यासकांनी मुळात असा तलाक देण्याची पध्दत इस्लाममध्ये नाहीच असा दावा केला. परंतु या अभ्यासावर रूढीने मात केली आणि अजून तरी ही पध्दत मुस्लीम समाजात रूढ राहिली आहे. तोंडी तलाक दिला जात असला तरी तो एकतर्फी असता कामा नये असा इस्लाममध्येच नियम आहे. तोंडी तलाकासुध्दा अनेक अटी आहेत, काही शर्थी आहेत आणि बर्‍याच गोष्टींचे पालन केल्याशिवाय असा तोंडी तलाक देता येत नाही. याउपरही तोंडी तलाक दिलेल्या महिलांपैकी ५९ टक्के महिलांना एकतर्फी तलाक देण्यात आला आहे असे आढळले.

मुस्लीम समाजात विवाहाच्यावेळी मुलीच्या नावाने मेहर नावाची एक रक्कम दिली जाते आणि तलाकाच्या प्रकरणात या मेहेरचा आधार महिलेला मिळू शकतो. परंतु संस्थेने केलेल्या पाहणी असे दिसून आले आहे की १६ टक्के महिलांना आपल्या विवाहाच्यावेळी दिलेली मेहेरची रक्कम किती आहे हेही माहीत नव्हते. ५६ टक्के प्रकरणात मेहेरची रक्कम तलाक पीडितेला दिली गेलेली नाही. पाहणी केलेल्या महिलांपैकी ६३ टक्के महिला अतीशय गरीब होत्या. तलाक दिल्यानंतरचे त्यांचे वार्षिक उत्पन्न वर्षाला ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा कमी होते. पण त्यांनाही मेहेरच्या रकमेचा किंवा पोटगीचा आधार दिला गेला नाही. ७९ टक्के महिलांना पोटगी मिळालेली नाही आणि ५६ टक्के महिलांना मेहेरची रक्कम मिळालेली नाही. या प्रकरणावरून भारतीय मुस्लीम समाजात तोंडी तलाक देण्याच्या पध्दतीवरून जनमत जागृती होत आहे असे दिसते.

Leave a Comment