प्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध

research
न्यूयार्क : शास्त्रज्ञांनी प्रौढांमध्ये आढळणा-या किंवा वैद्यकीय परिभाषेत टाईप २ म्हणून ओळखल्या जाणा-या मधुमेहाचे तीन उपप्रकार शोधून काढले असून त्यांच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला आहे.

या विषयावर माऊंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायन्स ट्रान्स्लेशनल मेडिसीन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांनी टाईप २ मधुमेहाच्या ११,००० रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अन्य माहितीबरोबरच रुग्णांच्या जनुकीय रचनेबाबतही माहिती होती. अभ्यासात असे दिसून आले की, मधुमेहाचा परिणाम या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे होत होता. पहिल्या प्रकारात रुग्णांना मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम झाला होता. दुस-या प्रकारात चेतासंस्थेचे विकार आणि विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी झाल्या होत्या. तर तिस-या प्रकारात रुग्णांना एचआयव्हीची बाधा अधिक प्रमाणात झाली होती. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमधील जनुकीय रचनाही विशिष्ट प्रकारची होती. त्यानुसार आता टाइप-२ मधुमेहाचे तीन उपप्रकार पाडण्यात आले आहेत. या संशोधनाचा वापर करून मधुमेहावर अधिक अचूक व परिणामकारच उपाय करता येतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment