भारत, संपन्न देश

wealth
जोहान्सबर्ग येथील द न्यू वर्ल्ड वेल्थ या संघटनेने जगातल्या २० श्रीमंत देशांची यादी केली असून खासगी मालमत्ता जास्तीत जास्त असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश केला आहे. भारताची खासगी मालमत्ता ३ हजार ४९२ अब्ज डॉलर्स एवढी असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. खरे म्हणजे भारतातल्या कोणत्याही आर्थिक गणनेचे निष्कर्ष काहीही जाहीर झाले तरी त्यावर किती विश्‍वास ठेवावा असा प्रश्‍न पडतो. कारण भारतात काळा पैसा प्रचंड संख्येने आहे. किंबहुना भारतातील काळ्या पैशाची अर्थव्यवस्था वैध संपत्तीशी पूर्णपणे समांतर चालेल एवढी प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्मदेव अवतरला तरी भारतीयांच्या खर्‍या पैशाची गणना कधीच होणार नाही. मात्र जोहान्सबर्गच्या या संस्थेने काळ्या पैशाचाही मागोवा घेण्याची काही वेगळी पध्दत अवलंबिली असेल तर कदाचित त्यांना भारताच्या संपत्तीचा अंदाज आला असेल.

या श्रीमंतीच्या बाबतीत अर्थातच अमेरिका सगळ्यात पुढे आहे. अमेरिकेतील खासगी मालमत्ता भारताच्या सोळापट म्हणजे ४८ हजार अब्ज डॉलर्सवर आहे. अमेरिकेच्या खालोखाल चीनचा क्रमांक आहे. परंतु अमेरिका एवढी श्रीमंत आहे की पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकामध्ये प्रचंड मोठे अंतर आहे. चीनची एकूण खासगी मालमत्ता आणि संपत्ती १७ हजार २५४ अब्ज डॉलर्स एवढी आहे. चीन आणि अमेरिका यांच्या संपत्तीतला फरक जसा मोठा तसाच भारत आणि चीन यांच्यातलाही फरक मोठा आहे. भारताची एकूण खासगी मालमत्ता ३ हजार ४९२ अब्ज डॉलर्स आणि चीनची मात्र १७ हजार २५४ अब्ज डॉलर्स म्हणजे चीन याबाबतीत भारताच्या अडीचपट श्रीमंत आहे. या क्रमवारीमध्ये जपानचा क्रमांक तिसरा आहे. जपानची खासगी मालमत्ता १५ हजार २३० अब्ज डॉलर्स एवढी आहे.

या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर जर्मनी, पाचव्या क्रमांकावर ब्रिटन, सहाव्या क्रमांकावर फ्रान्स, सातव्या क्रमांकावर इटली, आठव्या क्रमांकावर कॅनडा आणि नवव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. तिसर्‍या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंतचे सारे देश भारतापेक्षा श्रीमंत तर आहेतच परंतु त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा कितीतरी कमी आहे. मात्र लोकसंख्या कमी असूनसुध्दा या देशांनी औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये एवढी मजल मारली आहे की त्यांची खासगी मालमत्ता सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतापेक्षाही जास्त आहे. यापासून भारताने काहीतरी धडा घेतला पाहिजे.

Leave a Comment