निवडणूक निकालाचा अन्वयार्थ

election
काल झालेल्या दोन महानगरपालिका आणि ७५ नगरपंचायती यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फार कमी ठिकाणी सत्ता मिळाली आहे. पण एकूण कामगिरी पाहिली तर निवडणुकीच्या मैदानातील चारही पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली स्थिती सुधारलेली आहे. सत्ता मिळवणे म्हणजेच विजय असे समीकरण मांडून विश्‍लेषण केले तर भाजपाला हा इशारा आहे. परंतु एकूण जागांपैकी किती जागा कोणी मिळवल्या आणि या मिळालेल्या जागा पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा किती जास्त आहेत या निकषावर विश्‍लेषण केले तर भारतीय जनता पार्टीने आनंद मानावा अशी स्थिती आहे. अर्थात कोणी कसे विश्‍लेषण करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ज्याला भाजपाचा पाणउतारा झाला असाच निष्कर्ष काढायचा असेल त्याने कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवलीत भाजपाला सत्ता मिळाली नाही याच एका निकषावर परीक्षण करावे लागेल. परंतु या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपा हा एकच पक्ष असा आहे की ज्याने आपल्या जागा वाढवल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा दावा केला होता पण तिला तशी सत्ता मिळाली नाही. त्यामुळे हा भाजपाचा दारूण पराभव आहे, धक्का आहे असे विश्‍लेषण काही लोकांनी मांडले आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेला प्रत्येक पक्ष स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा दावा करतच असतो. पण तशी सत्ता मिळाली नाही याचा अर्थ त्या पक्षाला धक्काच बसला असा करता येईल का? विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत असा प्रश्‍न विचारता येऊ शकतो. खरे म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेत पूर्वी भाजपाच्या हातात केवळ ९ जागा होत्या आणि त्याही या पक्षाने शिवसेनेशी युती करून लढवलेल्या निवडणुकीतून मिळवल्या होत्या. पण आता शिवसेनेपासून फटकून राहून एकट्याने निवडणूक लढवून भाजपाने आपली संख्या ९ वरून ४२ वर नेली. भाजपाला सत्ता मिळवता आली नाही ही गोष्ट खरी परंतु ९ वरून ४२ वर संख्या नेणे हा एक प्रकारे पक्षाचा विजयच आहे. पण विश्‍लेषण करणारे काही लोक ही भाजपाची प्रगती नजरेआड करून भाजपाचा दारूण पराभव झाला असल्याचे ठोकून देतात.

दारूण पराभव कोणाचा झालाच असेल तर तो मनसेचा आहे. कारण मनसेची सदस्यसंख्या २७ वरून ९ वर घसरली आहे. याच महानगरपालिकेत कॉंग्रेसची संख्या १४ वरून ४ वर तर राष्ट्रवादीची सदस्यसंख्या १४ वरून २ वर घसरली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत कॉंग्रेसच्या हातात सत्ता येण्याची चिन्हे आहेत. तिथेही कॉंग्रेसला आपली सदस्य संख्या वाढवता आलेली नाही. ती ३३ वरून २७ वर घसरली आहे. परंतु सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेची समीकरणे जुळवण्याची सूत्रे कॉंग्रेसच्या हाती गेली आहेत आणि तेवढ्यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण फडणवीस यांचा राजीनामा मागायला निघाले आहेत. पण याच महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने ताराराणी आघाडीशी युती करून कॉंग्रेसपेक्षाही जास्ता जागा म्हणजे ३२ जागा मिळवल्या आहेत आणि स्वतःची सदस्य संख्या ३ वरून १३ वर नेली आहे. अशोक चव्हाण फडणवीसांचा राजीनामा मागताना आणि कॉंग्रेसला आता चांगले दिवस येतील अशी आशा बाळगताना डोंबिवलीत आपली सदस्य संख्या १४ वरून ४ वर घसरली आहे हे मात्र लक्षात घेत नाहीत.

निवडणुकीच्या निकालांचे विश्‍लेषण हे वस्तुनिष्ठ असले पाहिजे. तसे ते केेले नाही आणि अशा आकड्यातले काही विशिष्ट आकडे समोर ठेवून स्वतःचे समाधान करून घेतले तर तात्पुरते समाधान होईलही पण त्यामुळे आपल्याच पक्षाच्या प्रगतीची दारे बंद होतील कारण असे अर्धवट विश्‍लेषण हे विश्‍लेषण नसून प्रतारणा असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरपंचायतीच्या काही निवडणुका जिंकल्या आहेत. त्यावरून ते स्वतःचे समाधान करून घेणार असतील तर त्यांनी कोल्हापूरमध्ये आपली सदस्य संख्या २६ वरून १४ का खाली आली याचा विचार करावा लागेल. असाच विचार सगळ्याच पक्षांनी केला पाहिजे. विशेषतः मनसेने. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा हा एकखांबी तंबू पूर्णपणे कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. कल्याण-डोंबिवलीत तर त्याची अवस्था दयनीय झाली आहेच पण या पक्षाने कोल्हापुरात निवडणूकसुध्दा लढवली नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात ९६८ जागांसाठी मतदान झाले. त्यातल्या केवळ २ जागा मनसेला मिळाल्या. नगरपंचायतींच्या निवडणुकीतसुध्दा आकड्यावरून अशीच फिरवाफिरवी केली जाते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तुलनेत भाजपाला यश मिळाले नाही असे विश्‍लेषण मांडले जाते. पण त्या तुलनेत भाजपाने सगळ्या नगरपंचायती जिंकल्या पाहिजेत असे म्हणता येत नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीतसुध्दा भाजपाला निर्विवाद बहुमत मिळालेले नाही. ९६८ जागांपैकी सर्वाधिक २०८ जागा भाजपाला मिळालेल्या आहेत. कॉंग्रेसला १९९, राष्ट्रवादीला १७० आणि शिवसेनेला १०३ जागा मिळालेल्या आहेत. याही निवडणुकीत भाजपाचे यश उज्ज्वल नाही. परंतु विधानसभा निवडणुकीप्रमाणे आहे आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. नगरपंचायती निवडणुकीच्या आकड्यातसुध्दा पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काय स्थिती होती याचे आकडे कोठेच आलेले नाहीत पण पाच वर्षांपूर्वीचे आकडे खरेच काढून बघितले तर त्यावेळच्या निवडणुकीत भाजपाकडे दहा टक्केसुध्दा जागा नव्हत्या. त्या आता २० टक्क्यांपर्यंत गेल्या आहेत.

Leave a Comment