गव्हर्नरांचा मर्यादाभंग

rahghuram-rajan
भारतात असहिष्णुता वाढत चालला असल्याचा प्रचार करून सातत्याने काव काव करणार्‍या काही पुरोगामी डोम कावळ्यांच्या आवाजात अलीकडेच दोन नवे आवाज मिसळले गेले. एक आवाज मूडी या आर्थिक क्षेत्रात मानांकन देणार्‍या जागतिक संघटनेचा आहे. तर दुसरा आवाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा आहे. मूडीच्या आवाजाविषयी फार चिंता करण्याचे कारण नाही. ती अमेरिका धार्जिणी संघटना आहे आणि अमेरिकेच्या विविध ढोंगांमध्ये ती सहभागी असते. भारतामध्ये अल्पसंख्य मुस्लीमांच्या जीवाला धोका आहे. असा बभ्रा करणार्‍या या संघटनेने अमेरिकेत या बाबतीत काय चाललेले आहे आणि तिथे मुस्लीमांना किती धोका आहे हे सांगितले असते तर बरे झाले असते. अमेरिकेच्या सरकारच्या मुस्लीम विरोधी धोरणाचा फटका शाहरुख खान आणि डॉ. अब्दुल कलाम यांनासुध्दा बसलेला आहे.

रघुराम राजन यांचा आवाज मात्र फारच चिंता वाटावा असा आहे. रघुराम राजन यांच्या विचाराचे पुरोगामी डोमकावळे मोदी सरकारवर घटनात्मक यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप करत आहेत. परंतु रघुराम राजन हे भारतात सहिष्णुता असली पाहिजे असा आरडाओरडा करून स्वतःच अशाप्रकारे लोकनियुक्त सरकारच्या स्वायत्तत्तेवर घाला घालत आहेत. रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत आणि रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर घटनेने निर्मिलेली स्वायत्त यंत्रणा आहे. तेव्हा या एका यंत्रणेने दुसर्‍या यंत्रणेवर म्हणजे सरकारवर असा वावदूकपणाचा आरोप करावा ही घटनाच दोन स्वायत्त संघटनांमध्ये संघर्ष निर्माण करणारी आहे. रघुराम राजन यांना अशारितीने सरकारवर आरोप करण्याचा अधिकारसुध्दा नाही.

मात्र या गोष्टीचा विचार न करता रघुराम राजन हे या पुरोगामी बँडबाजामध्ये अनाहूतपणे सामील होऊन आपले फुटके वाद्य वाजवत आहेत. आजवर सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये बँकांच्या व्याजदरावरून बरेच मतभेद होते आणि त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही टीका टिप्पणीही केली होती. मात्र तिच्यामागचा हेतू देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चांगले प्रवाह वाहावेत असा होता. असा विषय वगळता जेटली यांनी कधीही रिझर्व्ह बँकेवर टीकाटिप्पणी केली नाही पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मात्र आपल्या अधिकारात नसलेल्या विषयावर अशी वावदूक टीकाटिप्पणी करून आपल्या अधिकाराची कक्षाही ओलांडत आहेत. मात्र असे करताना ते सवंग विचारवंतांच्या मांदियाळीमध्ये सहभागी होत आहेत.

Leave a Comment