लोकसंख्या विषयक विवेक

population
लोकसंख्या हा शाप की वरदान असा प्रश्‍न कोणा भारतीयाला विचारला तर तो शाप असेच उत्तर देईल कारण वाढती लोकसंख्या हा भारताचा प्रश्‍न आहे. या जगात असेही काही देश आहेत की ज्यांना लोकसंख्या हा शाप वाटत नसून वरदान वाटत आहे कारण ते देश घटत्या लोकसंख्येने त्रस्त आहेत.तिथे लोकांना अधिक मुले व्हावीत यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा देशांच्या यादीत आता चीनचाही समावेश झाला आहे आणि चीनच्या सरकारने लोकसंख्ये वरचे काही निर्बंध काढून घेऊन लोकांना अधिक मुलांना जन्माला घालण्याची अनुमती दिली आहे. सरकारने १९७४ साली जगातला एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेऊन एक मूल विषयक कायदा केला होता. सरकारच्या मनात आले आणि सरकारने सर्वांवर असा निर्बंध लादला की, यापुढे देशातल्या प्रत्येक जोडप्याला केवळ एकच मूल होईल. यापेक्षा अधिक मुले होतील त्या दांपत्यांना अधिकच्या मुलापोटी सरकारकडे जबर दंड भरावा लागेल. तो न भरल्यास त्या मुलाला ब्लॅक चाइल्ड अर्थात बेकायदा बालक म्हणून घोषित करण्यात येईल. त्याचे नाव रेशनकार्डावर येणार नाही. त्याला चीनचा नागरिक म्हणून मान्यता असणार नाही.

जन्माला येणारे ते मूल मुलगा आहे की मुलगी याला काही महत्त्व असणार नाही. मुलगा असो की मुलगी असो ते बालक एकुलते एकच असेल. अशाने देशाची लोकसंख्या मर्यादित होईल असा तिथल्या सरकारचा अंदाज होता. तो काही प्रमाणात खराही ठरला पण त्यातून इतर अनेक प्रश्‍न निर्माण झाले. त्यामुळे आता या सरकारने ते धोरण आणि निर्बंध मागे घेतला असून आता यापुढे प्रत्येक दांपत्याला दोन मुलांना जन्माला घालण्याचा अधिकार दिला आहे. एकच मूल असण्याच्या त्या नियमाने अनेक गंमती होत असत. या नियमातही काही महिलांनी पळवाटा शोधल्या होत्या. या नियमांचे नेमकेपणाने वर्णन करायचे तर असे म्हणता येईल की, एका महिलेला एकच बाळंतपण मंजूर आहे. त्या एका बाळंतपणात तिला जुळे झाले तर त्यात तिचा काय दोष? तेव्हा प्रत्येकीला एक प्रसूती मंजूर असावी. तिच्यात जुळ्याचा जन्म झाला तर ती दोन्ही अपत्ये अधिकृत समजावीत अशी मागणी लोकांनी केली. ती सरकारला मान्य करावी लागली. एकदा ही पळवाट सापडली की महिला लागल्या नव्या उद्योगाला. त्या ग्रामीण भागातल्या जडीबुटीवाल्या वैदूंच्या शोधार्थ निघाल्या. कारण चीनमध्ये असे काही वैदू आहेत की जे गरोदर महिलांना असे एक जालीम औषध देतात की त्याच्या सेवनाने तिला हमखास जुळेच होते. गेल्या काही वर्षात अशा वैदूंची फार चलती झाली आणि जुळ्यांचे प्रमाणही वाढले.

अर्थात ही गोष्ट सगळ्या महिलांना शक्य नव्हती. अनेकांना एकाच मुलावर किंवा मुलीवर थांबावे लागले. त्यातून एक नवा सामाजिक, मानसिक कम कौटुंबिक प्रश्‍न निर्माण झाला. या देशात गेल्या चाळीस वर्षात कोणालाही भाऊ नाही आणि बहिणही नाही. त्यामुळे मामा, आत्या, भाचा, नणंद अशी नातीच मुलांना माहीत नाहीत. केवळ आई, वडील, आजोबा आणि आजी हीच नाही माहीत. त्याचा एक गंभीर परिणाम जाणवायला लागला. शिवाय अनेकांना मुलगा असेल तर तो एकटाच असल्याने वृद्धांच्या पालनाचे प्रश्‍न निर्माण व्हायला लागले. ज्या काळात चीनने हा निर्णय घेतला त्या काळात चीन एवढा गरीब होता की त्याला ही लोकसंख्या परवडत नव्हती. आता चीन श्रीमंत झाला आहे आणि त्याला आता मनुष्यबळाची चणचण जाणवायला लागली आहे. त्यामुळे आता या एकच मूल असण्याच्या निर्बंधाची गरज राहिली नाही. आता सरकारने हा निर्बंध काढून घेतला आहे. ज्या काळात चीनने ही एकाच मुलाची सक्ती केली होती त्याच्याच आसपास भारतात आणीबाणी लागू झाली आणि संजय गांधी याच्या हातात सर्वाधिकार गेले. त्याला कुटुंब नियोजनाचे महत्त्व भलतेच पटले होते आणि चीन सारखाच आपल्याही देशात कुटुंब नियोजनाच्या सक्तीचा कायदा असावा अशी लहर त्याला आली होती.
हातात आलेल्या अधिकारांचा वापर करून त्याने भारतातही कुटुंब नियोजनाच्या सक्तीचा प्रयोग केला. रस्त्यात दिसेल त्याला पकडून त्याची शस्त्रक्रिया करण्याचा आदेश त्याने दिला.त्याचा परिणाम काय झाला हे माहीत आहेच. भारतीयांना ही सक्ती मंजूर नव्हती. त्यांनी आणीबाणी हटताच संजय गांधीला मतपेटीतून अस्मान दाखवले. असे असूनही अजूनही आपल्या देशात काही लोकांना कुटुंब नियोजनाची सक्ती असली पाहिजे असे वाटते. त्यांची भावना चांगली आहे पण त्यांना कुटुंब नियोजन म्हणजे नेमके काय हेच कळत नाही. लोकसंख्या कमी करणे म्हणजे कुटुंब नियोजन असा त्यांचा ग्रह आहे आणि असे संजय गांधीवादी मूढ लोक चीनकडे निर्देश करून सक्तीचे समर्थन करीत असतात. चीनने पहा कशी आपली लोकसंख्या रोखली तशी आपणही रोखली पाहिजे असे ते म्हणत असतात. पण अशा लोकांची आता पंचाईत होणार आहे कारण ज्या चीनचा आदर्श समोर ठेवून ते सक्तीचे समर्थन करीत होते त्या चीननेच आपल्या धोरणाची उपरती होऊन आपला हा सक्तीचा कायदा रद्द केला आहे. लोकसंख्या रोखण्याच्या बाबतीत अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी समोर येत असतात. लोकसंख्या कमी करण्याचा अतिरेक केला की लोकसंख्येतल्या वििवध वयोगटांचे संतुलन बिघडते. एक अवस्था अशी येते की, देशात सगळीकडे म्हातारेच लोक दिसायला लागतात. त्याचे काही परिणाम होतात. आता अशी अवस्था अमेरिकेसह अनेक प्रगत देशांची झाली आहे. चीनही म्हातारा व्हायला लागला आहे. म्हणून त्याला हा शहाणपणाचा निर्णय घ्यावा लागला.