निवडणुकीतले गंडेदोरे

bihar
आपल्या देशात पुरोगामी विचारवंत नावाचा एक ढोंगी वर्ग सातत्याने लोकांना तत्वज्ञान शिकवत वावरत असतो. त्यांच्या तत्वांमध्ये काही तथ्य असले तरी ते आपल्या तत्वानुसार वागत नाहीत. उलट ते लोक जनतेला जी तत्वे सांगतील त्याच्या नेमके उलट वागतात. त्यांच्या कथनीला करणीचा आधार नसतो. त्यामुळे त्यांची विधाने आणि त्यांची शिकवण जनता कधीच गांभिर्याने घेत नाही. किंबहुना आपल्या देशामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढूनसुध्दा अंधश्रध्दांचा जनतेच्या भोवती पडलेला विळखा कधीच ढिला होत नाही यामागे विचारवंतांची ही ढोंगबाजीच कारणीभूत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ज्या विचारांशी नाते सांगतात त्या विचारांमध्ये धार्मिक अंधश्रध्दा आणि कालबाह्य रुढी यांना अजिबात स्थान नाही. परंतु त्यांच्या विचाराचे लोक अशा रुढीपासून कितपत दूर असतात हा प्रश्‍न आहे.

नितीशकुमार यांना निवडणूक सोपी जावी यासाठी तांत्रिकाची मदत घेण्यात आली असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे आणि नितीशकुमार यांनीही या वृत्ताचा इन्कार केलेला नाही. एका बाजूला कालबाह्य रुढीवर प्रहार करायचे आणि दुसर्‍या बाजूला त्याच रुढीनुसार वागायचे हा नितीशकुमार यांचा ढोंगीपणा या तांत्रिकाच्या मदतीमुळे उघड झाला आहे. ही केवळ नितीशकुमार यांचीच रीत आहे असे नाही तर राजकीय क्षेत्रातील बरेच कार्यकर्ते याच पध्दतीने वागत असतात. गेल्या महिन्यात काही महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र या निवडणुका पितृ पंधरवड्यात जाहीर झाल्यामुळे त्या जाहीर झाल्याबरोबर कोणीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.

पक्ष पंधरवडा संपून नवरात्र सुरू होताच मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांची एकच गर्दी उसळली. विज्ञान युगातला हा अंधविश्‍वास आपल्या नेत्यांच्या बौध्दिक कुवतीवर बराच प्रकाश टाकून जातो. साधारणपणे अशा ढोंग धत्तुर्‍यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा तत्सम हिंदुत्ववादी संघटनांना दोषी धरले जाते. परंतु घटस्थापनेचा मुहूर्त पाहणार्‍यांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचे लोक होते हे विसरता येत नाही. उलट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्याने मुहूर्तामागच्या वेडेपणावर बरेच प्रहार केलेले आहेत. अर्ज दाखल करायलाच काय पण बांधकाम करायला, प्रवास करायला, विवाह करायलासुध्दा मुहूर्ताची गरज नाही असे सावरकरांनी आवर्जुन प्रतिपादन केले आहे. पण आजकाल हिंदुत्ववादी नेतेसुध्दा सावरकरांच्या तत्वानुसार चालत नाहीत.

Leave a Comment