तुरीच्या टंचाईवर उपाय

tur-dal
भारतात तुरीच दाळ महाग झालेली आहे आणि या महागाईवरून मोठा गोंधळ माजलेला आहे. तो स्वाभाविक आहे. ही महागाई टळावी म्हणून सरकारने व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या. काही साठे जप्त केले आणि तुरीच्या दाळींचे दर २०० रुपयांवरून १४० रुपयांपर्यंत खाली आणले. ग्राहकांच्या संघटनेची मागणी हे दर ८० रुपये प्रतिकिलो असावेत अशी आहे. परंतु जोपर्यंत तुरीच्या उत्पादनाला गती मिळत नाही तोपर्यंत ही मागणी मान्य होईल असे वाटत नाही. मुळात उत्पादनाच कमी झाले की कोठे ना कोठेतरी टंचाई निर्माण होणार आणि टंचाई निर्माण झाली की भाव वाढणार. त्यामुळे तुरीच्या डाळीच्या भावाच्या मुळावर घाव घालायचा असेल तर तुरीचे उत्पादन वाढवले पाहिजे. तुरीच्या बाबतीत जाणवणार्‍य काही मुख्य बाबी आहेत. त्यावर इलाज केला गेला पाहिजे.

सध्या तुरीचे जे भाव आहेत त्यांचा विचार केला तर तूर हे कोरडवाहू पीक उसापेक्षाही जास्त पैसे देऊन जाऊ शकते. परंतु तरीही ऊस पिकवणारे लोक तुरी पिकवत नाहीत. कारण तुरीच्या पिकाची खात्री नसते. ती खात्री दिली तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुरीचे पीक घेतील. तुरीच्या पिकाची खात्री न देण्याचे कारण म्हणजे तुरीच्या शेंगेवर पडणारी अळी. तुरीचे पीक छान येते परंतु याचा फुलोरा गळून पडतो. फुलोरा गळून पडल्याने फार नुकसान होत नाही. पण चांगल्या शेंगा येऊन त्या शेंगांमध्ये अळ्या झाल्या की ६० टक्के पीक नष्ट होते. तेव्हा शेंगामध्ये होणार्‍या अळीवर इलाज शोधला गेला तर तुरीची उपलब्धता वाढू शकते आणि तसा इलाज उपलब्ध झाल्याने तुरीच्या पिकाची खात्री वाढून शेतकरीही जास्त प्रमाणावर ते पीक घेऊ शकतात.

भारतात इक्रीसॅट या संस्थेने तुरीच्या शेंगातील अळ्यांचा मुळातच बंदोबस्त करणारे तुरीचे जनुकीय बदल केलेले बी शोधून काढले आहे. सरकारने या बियाणाच्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुरीची दाळ दरवर्षी महाग होत चालली आहे आणि सरकारने कितीही प्रशासकीय कारवाया केल्या तरी ती महागच होत जाणार आहे. तिला कायम स्वस्त करायचे असेल तर जनुकीच बियाणे हाच एकमेव उपाय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुरीचे पीक हे कोणीही मुख्य पीक म्हणून घेत नाही. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग किंवा अन्य पिकांच्यामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. तेव्हा सरकारला तुरीचे उत्पादन वाढवायचे असेल तर तूर हे मुख्य पीक म्हणून घेण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.