गीताची कहाणी

geeta
१५ वर्षांच्या वास्तव्यानंतर ती भारतीय मुलगी परदेशी परत आली आहे. तिचे नाव नक्की काय आहे हे कोणालाही माहीत नाही. पण पाकिस्तानात ज्यांनी तिचा सांभाळ केला त्यांनी तिला गीता हे नाव दिले. आज ती परत आली आहे आणि तिच्या रुपाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या इतिहासात एक पान लिहिले गेले आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे सरकारी पातळीवरचे संबंध म्हणावे तसे सलोख्याचे नाहीत हे सर्वांना माहीतच आहे. परंतु सरकारी पातळीवर बेबनाव असला तरी पाकिस्तानातल्या अनेक लोकांच्या मनात भारताविषयी प्रेम आहे आणि भारतातल्याही अनेक लोकांना भारत-पाकिस्तान संबंध चांगले असावेत असे मनापासून वाटते. असे सांगितले जात असते. त्याचा प्रत्यय या गीताच्या प्रकरणाने आणून दिला आहे.

पाकिस्तानच्या विविध कारागृहांमध्ये खितपत पडलेले भारतीय आणि भारताच्या विविध तुरुंगांमध्ये अटकेत असलेले लोक यांच्या कहाण्या नेहमीच प्रसिध्द होत असतात. या कहाण्यांच्या पार्श्‍वभूमीवर आणि पाकिस्तानात हिंदूंचा छळ होत असल्याच्या कहाण्यांच्या पार्श्‍वभूमीवर गीता नावाच्या या हिंदू मुलीची घरवापसी खरोखरच दोन देशांच्यामध्ये सदिच्छांचा पूल बांधणारी आहे. तिला पाकिस्तानात इधी फाऊंडेशन या संघटनेने सांभाळले. ती मूक आणि बधीर आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे गीताची ही कहाणी उजागर झाली आणि तिच्या भारतातील परतीचा मार्ग मोकळा झाला. गीताच्या रुपाने पाकिस्तान आणि पाकिस्तानी यांच्याकडून अपवादात्मक वर्तणुकीचे दर्शन घडले. तिच्या भारतातील आगमनाचा मोठा सोहळा झाला.

ती काही व्हीआयपी नाही. पण तरीही असा सोहळा व्हावा हे एक अप्रुप आहे. ती व्हीआयपी नसली तरी तिच्या रुपाने दोन देशातील संबंधांच्या इतिहासातील एक प्रकरण नक्कीच घडलेले आहे. दोन देशात तणावाचे संबंध असताना अशा प्रकारे एका देशाकडून दुसर्‍या देशाच्याबाबतीत सद्भावनेची कृती घडावी ही गोष्ट वातावरण निर्मितीसाठी निश्‍चितपणे उपयोगाची आहे. म्हणून गीता व्हीआयपी नसली तरी तिच्या रुपाने घडलेली घटना ही दोन देशांच्या संबंधात महत्त्वाची आहे. पाकिस्तानने गीताच्या भारतातील घरवापसीबाबत कसलेही तांत्रिक अडथळे आणले नाहीत. तीही गोष्ट चांगली झाली. मात्र असे दोन देशांच्या दरम्यान सदिच्छा पेरणारे प्रसंग सातत्याने आणि नित्याने घडायला हवेत. त्यासाठी सदिच्छा आणि सद्भावना ही अंगभूत असली पाहिजे.

Leave a Comment