शास्त्रज्ञांच्या निवडीतही भ्रष्टाचार; सीबीआयची चौकशी सुरू

ncaor
नवी दिल्ली : आजपर्यंत देशात प्रत्येक क्षेत्रांत भ्रष्टाचार झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आली आहेत किंवा येत असतात. पण आता देशात संशोधन करून नव्या गोष्टींची ओळख करून देणा-या शास्त्रज्ञांच्या निवडीत देखील भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर अंटार्टिका अ‍ॅण्ड ओशन रिसर्च (एनसीएओआर) संशोधन संस्थेच्या भरतीतील अनियमितता पुढे आली असून २००२ ते २०१३ दरम्यान झालेल्या भरतीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आता सीबीआय चौकशी करीत आहे. या प्रकरणी संस्थेचे संस्थापक पी.सी.पांडे यांना सीबीआयने आरोपी केले आहे. इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेतदेखील पांडे यांनी कार्य केलेले आहे. तसेच त्यांना विक्रम साराभाई रिसर्च अ‍ॅवॉर्ड हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एनसीएओआरमध्ये वैज्ञानिकांच्या झालेल्या भरतीत चुकीच्या लोकांची निवड करण्यात आली होती. किती जणांची अशाप्रकारे निवड झाली याची सीबीआयकडे सध्यातरी माहिती नाही. या प्रकरणी सीबीआयने एनसीएओआरच्या काही वरिष्ठ अधिकारी तसेच शास्त्रज्ञांच्या विरुद्ध भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सूत्राच्या माहितीनुसार गोवा येथील एनसीएओआर या संस्थेत शास्त्रज्ञांच्या भरतीमध्ये काही अपात्र शास्त्रज्ञांना नोकरी देण्यात आल्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. गेल्या दहा वर्षांत एसीएओआरमध्ये अपात्र शास्त्रज्ञांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या भरती प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठ्या प्रमाणात अपात्र शास्त्रज्ञ आणि अधिका-यांची भरती करण्यात आल्याचे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संस्थेतील वरिष्ठ अधिका-यांना भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर लाच दिली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. एसीएओआरमधील या भरती घोटाळ्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कारण पहिल्यांदाच शास्त्रज्ञ भरतीमधील हा सर्वांत मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणावरून देशातील प्रत्येक क्षेत्राला भ्र्रष्टाचाराचा कॅन्सर लागलेल्याचे स्पष्ट होत आहे. सीबीआयच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.