बॅंकाच जिरवतात काळा पैसा: प्रा. अभ्यंकर

black-money
पुणे: आपल्या नफ्याचा अथवा गुंतवणुकीचा आकडा फुगविण्यासाठी देशातील बॅंका काळा पैसा जिरविण्याचे मार्ग उपलब्ध करून देतात आणि भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करतात; असा आरोप ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक कॉ अजित अभ्यंकर यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना केला.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल करण्यापेक्षा खाजगीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन यामुळे बॅंका नफेखोरीकडे वळत आहेत. आपला एनपीए कमी दाखविण्यासाठी कर्जांची पुनर्रचना केली जाते. ही पुनर्रचनेची प्रक्रिया ही कागदावरची धूळफेक असून बॅंकांचे सर्वात मोठे थकबाकीदार असलेल्या कॉर्पोरेट उद्योगांना तारण्यासाठी बॅंका आपले सर्वस्व पणाला लावतात; अशी टीका प्रा अभ्यंकर यांनी केली.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्याच्या आणि विदेशात गुंतविलेला भारतीय नागरिकांचा काळा पैसा भारतात परत आणण्याच्या कितीही वल्गना केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात हे सरकार काळ्या पैशाबबत उदासीन असल्याचा आरोप प्रा. अभ्यंकर यांनी केला. भारतीयांचा 4 हजार 700 कोटी रुपये एवढा काळा पैसा विदेशात गुंतविण्यात आल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. मात्र हे हिमानगाचे टोक असून प्रत्यक्षात ही रक्कम हजारपटीने अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला.

भारतीय अर्थव्यवस्थेला सुरळीत मार्गाला लावण्याऐवजी तिचे वित्तियीकरण करण्याची चूक या पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने केली आणि आताचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकारही तीच चूक करीत असल्याचे मत व्यक्त करून प्रा. अभ्यंकर म्हणाले की; प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा कागदावर आभासी पैसे दाखविणाऱ्या वित्तियीकरणाला विकास मानल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कागदावर कितीही बळकट दिसत असली तरीही प्रत्यक्षात त्यात अमेरिकेच्या धर्तीवर बुडबुडे निर्माण होऊन ते फुटण्याची भीती आहे.

Leave a Comment