इतिहासावर नवा प्रकाश

pranab-mukherjee
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे १९८४ सालपासून पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतले उमेदवार म्हणून सात्यत्याने चर्चेत येत गेले आहेत. परंतु ३-४ वेळा संधी येऊनही त्यांची बस चुकली. गांधी घराण्याने त्यांना संधी दिलीच नाही. मात्र हे कसे घडत गेले याच्यावर माखनलाल फोतेदार यांच्या पुस्तकात छान प्रकाश पडला आहे. दिल्लीतल्या राजकारणाचे रंग फार अनाकलनीय असतात. आपल्याला हे राजकारण नेते घडवतात असे वाटत असते. परंतु प्रसिध्दीपासून फार दूर राहून पडद्यामागून हालचाली करणारे काही अपरिचित आणि अप्रसिध्द लोकच राजकारणाची सूत्रे बेमालूमपणे हलवत असतात. आपणा सर्वांना मनमोहनसिंग माहीत आहेत. सोनिया गांधी माहीत आहेत. परंतु अहमद पटेल फारच कमी लोकांना माहीत आहे. असे असले तरी गेली दहा वर्षे केंद्रात जे राजकारण घडले त्यावर अहमद पटेल यांची छाप सर्वाधिक प्रमाणात पडलेली आहे. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये अशा लोकांचे किचन कॅबिनेट फार सामर्थ्यशाली होते. एखाद्या नेत्याचे भवितव्य घडवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या कानी लागण्याचे सामर्थ्य या किचन कॅबिनेटच्या एकेका सदस्यांच्या अंगी होते. त्यांची नावे लोकांना माहीत नाहीत. पण त्यात आर. के. धवन, यशपाल कपूर आणि माखनलाल फोतेदार ही नावे फार आघाडीवर होती.

असे लोक राजकारणातल्या अनेक खळबळजनक घटनांचे साक्षीदार असतात आणि बहुसंख्यवेळा सूत्रधारही असतात. असे लोक तांेंड उघडतात तेव्हा इतिहासातल्या अनेक गोष्टी उघड होतात. नव्याने माहीत होतात. माखनलाल फोतेदार हे इंदिरा गांधींच्या जवळ तर होतेच पण नंतरच्या काळात राजीव आणि सोनिया गांधी यांच्या फार निकट नसले तरी त्यांचा केंद्रातल्या राजकारणाच्या वातावरणात वावर होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या चिनार लीव्हज् या पुस्तकाला ऐतिहासिक दस्तावेजाचे महत्त्व आले आहे. त्यांनी वर्णन केलेल्या घटनातील व्यक्तींपैकी सोनिया गांधी या हयात आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी या पुस्तकात काय म्हटले आहे याला विलक्षण महत्त्व आले आहे. गेली दहा वर्षे मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते तरी दिल्लीच्या सत्ताकारणात सोनिया गांधी हे एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी फोतेदार काय म्हणतात हे समजून घेणे मनोरंजक ठरणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधींच्या नंतरच्या काळामध्ये आगामी पंतप्रधान म्हणून प्रणव मुखर्जी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत आपल्यालाच पंतप्रधान केले जाईल अशी प्रणव मुखर्जी यांनासुध्दा आशा होती. तसे त्यांनी सूचितही केले होते. परंतु राजीव गांधी हे पंतप्रधान पदाला इच्छुक होते.

नकळतपणे राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्या स्पर्धा निर्माण झाली. पक्षाचे बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते नेतृत्वाच्या गुणवत्तेपेक्षा घराण्याला अधिक महत्त्व देणारे असल्यामुळे या स्पर्धेत राजीव गांधींची सरशी झाली. त्यांनीही पंतप्रधान झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांची उपेक्षा केली. तरीही राजीव गांधींच्या हत्येनंतर पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. १९९० साली विश्‍वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार ११ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण करून पडले. तेव्हा कॉंग्रेसच्या हाती सत्ता येणार अशी संभावना निर्माण झाली. राजीव गांधी यांचे समर्थक त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यास सरसावले. परंतु त्या काळात राजीव गांधींची प्रतिमा बोफोर्स प्रकरणामुळे डागाळली होती. म्हणून तत्कालीन राष्ट्रपती आर. वेेंकटरमन यांनी राजीव गांधींना पंतप्रधान पदाची शपथ न देण्याचा निर्णय घेतला. परिणामी राजीव गांधींची संधी हुकली. याही वेळी प्रणव मुखर्जी पक्षाचे संसदीय नेते झाले असते तर ते पंतप्रधान होऊ शकले असते मात्र राजीव भक्तांनी पुन्हा एकदा प्रणव मुखर्जींना विरोध केला. त्यावेळी कॉंग्रेसने हाती १९० खासदार असूनही सरकार तयार करण्यास असमर्थता दर्शवली आणि चंद्रशेखर यांना पाठिंबा दिला.

प्रणव मुखर्जी यांची आणखी एक संधी अशीच हातची गेली. १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पक्षाची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती गेली. मात्र त्यांचे पक्षावर वर्चस्व नव्हते. ९८ साली तशी संधी आली. सोनिया गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला आणि तो एका मताने मंजूरही झाला. त्याचवेळी सोनिया गांधी यांना सरकार स्थापन करण्याची संधी चालून आली. परंतु त्यांना पुरेसे पाठबळ मिळाले नाही. मुलायमसिंह यादव यांचा पाठिंबा त्यादृष्टीने निर्णायक होता. परंतु त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे सोनिया गांधींची संधी हुकली. या मागची कारणे आता उघड होत आहेत. सोनिया गांधींना बहुमत मिळाले असते तर त्या मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करणार होत्या. परंतु कॉंग्रेस पक्षात माधवराव शिंदे हे त्यांच्या विरोधात होते. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान होणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलायमसिंह यांचे निकटचे सहकारी अमरसिंग यांना ही गोष्ट पटवली आणि मुलायमसिंह यांनी सोनिया गांधींना ठेंगा दाखवला. मनमोहनसिंग यांच्याऐवजी सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जींचे नाव पुढे करावे असे शिंदे यांचे म्हणणे होते. पण सोनिया गांधी प्रणव मुखर्जींना आपला प्रतिस्पर्धी समजत होत्या. त्यामुळे त्यांचीही संधी गेली आणि प्रणव मुखर्जी यांचीही संधी गेली. अशा इतिहासावर फोतेदार यांच्या पुस्तकाने नवा प्रकाश टाकला आहे.

Leave a Comment