शिवसेनेची अवस्था

shivsena
शिवसेनेने नेमके कसे वागावे हे पक्षाच्या नेत्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची कुतरओढ चालू आहे. गुलामअली प्रकरण आणि त्यानंतर झालेले कसुरी प्रकरण या दोन्हीमध्ये शिवसेनेने काय कमावले आणि काय गमावले याचा हिशोब मांडायला गेलो तर शिवसेनेच्या बाजूला काहीच राहणार नाही. शिवसेना तत्वही गमावून बसली आहे आणि व्यवहारही तिच्या फायद्याचा राहिलेला नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचे नांदणे एखाद्या भांडकुदळ दाम्पत्याप्रमाणे सुरू आहे. दोघेही एकमेकावर दोषारोप करतात. उणीदुणी काढतात. असे कडाक्याचे भांडण बघून माध्यमांमध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होते. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर भाजपाला बहुमत कसे सिध्द करता येईल याची गणिते मांडली जातात. मात्र शेवटी कितीही भांडलोत तरी युती कायम ठेवावीच लागणार आहे. याचा कुणाला तरी साक्षात्कार होतो आणि युती अभंग असल्याची ग्वाही देऊन दोन्ही पक्षात शांतता प्रस्थापित होते. नवा वाद निर्माण होईपर्यंत. कसुरी प्रकरणाने सुरू झालेला वाद असाच आता संपुष्टात आला आहे. पण अशा प्रकारच्या भांडणामध्ये आपली लाचारी स्पष्ट होत आहे याचे भान शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना राहिलेले नाही.

कोणत्याही भांडणाचा शेवट युती अभंग आहे या वाक्याने होतो हे खरे असले तरी या वाक्यामधून शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे हा अर्थ स्पष्ट होत असतो. शिवसेेनेशी भाजपाशी मतभेदच असतील तर त्यांनी सरकारमधून सरळ बाहेर पडावे. पुढे काय होईल त्याची चिंता करू नये. कारण शेवटी शिवसेनेच्या मते तिला आपली तत्वे प्रिय आहेत. मात्र तत्वासाठी भांडायचे आणि त्याच तत्वांशी तडजोड करून सत्तेला चिकटून राहायचे असे दुटप्पी वर्तन शिवसेनेकडून होत आहे. भांडणाचा असा शेवट होत असताना त्याचे विश्‍लेषण केले जाते आणि शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही यावर मतप्रदर्शन होते. तेव्हा काही गोष्टी उघड होतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सरकार आणि युती यांच्यासंबंधात शिवसेनेची पूर्ण वैचारिक कोंडी झालेली आहे. शिवसेनेला आपली ताकद भाजपापेक्षा जास्त आहे असा भ्रम झाला होता. तो आता उतरलेला आहे. परंतु उध्दव ठाकरे वस्तुस्थिती मानायला तयार नाहीत. ते अजूनही भाजपावर वरचढपणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते तर त्यांना वारंवार, हवे तर सत्तेत रहा नाहीतर बाहेर पडा असा सरळ इशाराच देत आहेत. शिवसेनेची मात्र सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत नाही.

सत्ता कोणाला नको आहे? सत्तेवर लाथ मारण्यासाठी फार मोठी नैतिक हिम्मत लागते. ती शिवसेनेत नाही. कदाचित उध्दव ठाकरे यांच्यात ती असेल तर ती दाखवून सत्तेतून बाहेर पडण्याइतकी एकी आपल्या पक्षात नाही हे त्यांना माहीत आहे. बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर सारे शिवसैनिक आणि मंत्रीपदाचा लाभ झालेले ज्येष्ठ नेते आपल्या मागे येतील याची त्यांना खात्री नाही. म्हणजे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर सत्ताही जाईल आणि काही नेते सत्तेला चिकटून राहिल्यामुळे पक्ष फुटेल अशी भीती त्यांना वाटते. एकंदरीत उध्दव ठाकरे सत्तेवर लाथ मारण्याच्या वल्गना करत असले तरी ते त्यांना शक्य नाही हे प्रत्येकवेळी स्पष्ट होत आहे. असे असूनही उध्दव ठाकरे भाजपाशी भांडण उकरून काढत आहेत आणि आपल्या लाचारीचा अविष्कार घडवत त्या भांडणाचा शेवटही करत आहेत. यातून आपली प्रतिमा डागाळत आहे याची त्यांना कल्पनाच नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रात जाणकार लोक वारंवार एकच प्रश्‍न विचारत आहेत की, उध्दव ठाकरे यांचा राजकीय सल्लागार कोण? की त्यांना कोणी सल्लाच देत नाही आणि ते आपली लहर फिरेल तसे निर्णय घेत राहतात? तसे असेल तर ते शिवसेनेला संपवत चालले आहेेत असे म्हणावे लागेल.

खरा राजकारणी नेता आपल्या पडत्या काळामध्ये फार हुशारीने आणि छदमी का होईना पण नम्रपणे वागत असतो. माणसाची वाईट वेळ असते तेव्हा त्याने काही प्रमाणात अपमान गिळण्याची तयारी ठेवली पाहिजे. अपमान होताच तो डंख मारायला लागला तर अपमानाचे रुपांतर मानात तर होत नाहीच पण डंख मारण्यातून नव्या समस्या निर्माण होतात. शिवसेनेला आपली अशी वेळ आलेली आहे हे कळत नाही. खरे म्हणजे शिवसेनेने ही वेळ स्वतःहून ओढवून घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच भाजपाशी जमवून घेतले असते तर युती तुटली नसती आणि ही वेळही आली नसती. मात्र भाजपापेक्षा आपली ताकद मोठी आहे या भ्रमात त्यांनी भाजपाशी व्यवहार केला. तसा तो करण्याआधी आपली राज्यातली खरी ताकद किती आहे याचा अंदाज घ्यायला हवा होता. तो वस्तुनिष्ठ असायला हवा होता. परंतु या बाबतीत शिवसेना नेतृत्वाची परिपक्वता कमी पडली. विधानसभेच्या निवडणुकीत युती करून १०० ते १२५ जागा लढवल्या असत्या तर कदाचित ८० ते ८५ आमदार निवडून आले असते. भाजपाच्या आणि शिवसेनेच्याही खर्‍या ताकदीची मूठ झाकलेली राहिली असती आणि शिवसेनेचा आब राहिला असता मात्र तिथे उध्दव ठाकरे चुकले आणि आब गमावून बसले. अाता बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने प्रत्येक निर्णय चुकीच्या पध्दतीने घेत चालले आहेत आणि पक्षाची अधोगती होत आहे.

Leave a Comment