बँक घोटाळा

bob
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशाचे अर्थव्यवहार वाढले असले तरी त्याच्या आडून आर्थिक गैरव्यवहारसुध्दा वाढले आहेत. बनावट कंपन्या आणि वायद्याचे व्यवहार यातून देशात तयार झालेला काळा पैसा तसेच बेकायदा संपत्ती बँकांचा वापर करून परदेशात पाठवण्याचे व्यवहारसुध्दा वाढले आहेत. अशाच एका व्यवहारात बडोदा बँकेच्या दोघा अधिकार्‍यांना तसेच एचडीएफसी बँकेच्या तिघांना अटक केली आहे. माणसाला पैशाची हाव आवरता येत नाही. बेकायदारित्या मिळणारा पैसा समोर दिसायला लागला की त्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि तो ते व्यवहार करण्यास उद्युक्त होतो. खरे म्हणजे तो एक गुन्हा असतो आणि त्यांचे आतले मन त्यांना तो करण्यापासून परावृत्त करत असते. मात्र आपले सारे काळे व्यवहार खपून जातील आणि कोणालाच काही पत्ता लागणार नाही अशा कल्पनेने ते बिनदिक्कतपणे अशा व्यवहारात उतरतात.

बडोदा बँकेच्या या व्यवहारामध्ये १५ बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यांच्या नावे हॉंगकॉंगमध्ये ६ हजार १७२ कोटी रुपयांचा काळा पैसा बँकेच्या मार्फत पाठवण्यात आला. बँकेचे अधिकारी त्यात सामील झाल्यामुळे हा व्यवहार बिनबोभाट होत होता. रिझर्व्ह बँकेला या पैशाच्या व्यवहाराबद्दल शंका आली. कारण बँक ऑफ बडोद्याच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेत एका वर्षाच्या कालावधीत ५९ नवी खाती उघडण्यात आली. या खात्यामार्फत प्रचंड मोठी रक्कम परदेशात पाठवली गेली. व्यवहार संशयास्पद होता परंतु या संबंधातल्या कायद्यातील पळवाटा वापरून तो पाठवला जात होता. या पळवाटा बँकेचे अधिकारीच दाखवत होते. त्यामुळे आता बँकेचे अधिकारीच अडचणीत आले आहेत.

या १५ बनावट कंपन्या नेमक्या कशाच्या होत्या हे दाखवण्यासाठी जी नाटके करण्यात आली त्या नाटकातून या प्रकरणाचे पितळ उघडे पडले. कारण काही कंपन्यांनी तांदूळ निर्यात केल्याचे दाखवले काही कंपन्यांनी भारतात उपलब्ध असलेलाच माल हॉंगकॉंगमधून आयात करत असल्याचे दाखवले. एकंदरीत आयात-निर्यातीचा व्यवहार बनावटच असल्यामुळे त्यांच्याविषयी शंका उपस्थित होण्यास मदत झाली. अशा प्रकारे खोटे व्यवहार दाखवताना ते कधीतरी उघडे पडतील याचा विचार त्याने करायला हवा होता. परंतु एकदा पैशाची हाव सुटली की माणसाला जसा संयम राहत नाही तसे तारतम्यही राहत नाही आणि त्यातूनच तो अडकत राहतो.

Leave a Comment