इसिस संकटात

isis
सीरिया आणि इराकमध्ये प्रचंड प्रमाणावर दहशतवादी कृत्ये करणार्‍या इसिस संघटनेवर इराकी वायूदलाने प्रचंड हल्ले सुरू केले असून अनबार प्रांतात झालेल्या अशा हल्ल्यांमध्ये इसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी हा गंभीर जखमी झाला आहे. अमेरिका, इराक आणि सीरियातील राज्यकर्ते असद यांनी संघटितपणे इसिसचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात इसिसचा प्रमुख जखमी झाल्यामुळे इसिसला मोठा धक्का बसला आहे. अनबार प्रांतात झालेल्या हल्ल्यात बगदादीचे तीन ज्येष्ठ सहकारी ठार झाल्याचे वृत्त आहे. हाही मोठा धक्का आहे. अल बगदादी हा आपल्या सहकार्‍यांच्या बैठकीसाठी करबलाकडे जात असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. त्यात ठार झालेला अबु सईद अल कारबुली हा फार महत्त्वाचा नेता मानला जात होता. अमेरिकेने इसिसविरोधी मोहीम तीव्र केली असून, तिच्यामुळे बगदादी हा हतप्रभ झाला आहे.

अल बगदादी याला धर्मभोळ्या मुस्लीम तरुणांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तेच त्याचे बळ असल्याचे मानले जाते. परंतु विशेष करून अमेरिका आणि इराक यांच्या सरकारी फौजांपुढे इसिसचे नखरे फार दिवस चालतील असे दिसत नाही. त्यामुळे एक ना एक दिवस अल बगदादीची अवस्था ओसामा बिन लादेनसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्‍वास अमेरिकेला वाटतो. किंबहुना काल त्याचे जखमी होणे आणि त्याच्या नजिकच्या तीन लोकांची हत्या होणे या गोष्टी अल बगदादीचा प्रभाव ओसरत चालल्याचे दर्शक मानल्या जातात. वास्तविक पाहता अल बगदादीची सारीच अवस्था लादेनसारखी आहे. सीरियातल्या बंडखोरांना अमेरिकेने फूस दिली तशीच ती इसिसलाही दिली. परंतु इसिसने ज्या पध्दतीने हिंसाचार पसरवायला सुरूवात केली ती पध्दत अमेरिकेलाही मान्य होण्यासारखी नाही. त्यामुळे सुरूवातीला आपण ज्याला मदत केली त्याच बगदादीला संपवणे आता अमेरिकेला भाग पडत आहे.

ओसामा बिन लादेनच्या बाबतीत नेमके असेच झाले होते. बगदादी हा लादेनप्रमाणेच उच्चशिक्षित आहे. तो इराकमधलया बगदादचा राहणारा असल्यामुळे बगदादी असे नाव लावतो. पण त्याचे मूळ नाव अव्वाद इब्राहिम अली अल बद्री असे आहे. त्याने इस्लामीक स्टडीजमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केले आहे आणि त्याच विषयावर डॉक्टरेट मिळवली आहे. त्याला अमेरिकेने पूर्वी पकडले होते आणि कैदी म्हणून बुक्का येथे ठेवले होते पण त्या २००४ साली त्याला मुक्त केले गेले आणि मदत केली गेली. तीच आता अमेरिकेच्या अंगलट आली आहे.

Leave a Comment