स्मारकाचे राजकारण

modi
मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमावरून बरेच राजकारण सुरू आहे. काहींनी या कार्यक्रमाचा संबंध बिहारशी जोडला तर शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यापूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारने ज्या गतीने या स्मारकाचे काम करण्यास सुरूवात केली होती. पण प्रत्यक्षात कसल्याही कायद्यात बदल करण्याची गरज नाही हे नरेंद्र मोदींच्या लक्षात आले. कॉंग्रेस सरकार सत्तेवर असते तर हा कार्यक्रम आता झालाच नसता. तो २०१९ सालच्या निवडणुकीच्या तोंडावर झाला असता. त्या मानाने मोदी सरकारने केलेली कृती घाईचीच वाटण्याची शक्यता आहे. या निमित्ताने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जो गोंधळ घातला तो मात्र भाजपा-सेना युतीमधील अंतराय वाढवणारा ठरणारा आहे.

भाजपाच्या सरकारने या कार्यक्रमाची निमंत्रणे राज शिष्टाचारानुसार ज्यांना पाठवणे आवश्यक होती त्यांना ती पाठवलेली आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना ती पाठवलेली आहेत. मुंबईच्या महापौर शिवसेनेच्याच आहेत. पण त्यांना शिवसेनेच्या म्हणून बाजूला सारलेल्या नाहीत. तर राज शिष्टाचार त्यांना निमंत्रण दिलेले आहे. उध्दव ठाकरे यांना निमंत्रण नाही असा आरडाओरडा आधीच झाला. पण प्रत्यक्षात त्यांना निमंत्रण दिलेले आहे. ते किती दिवस आधी पाठवायचे याला काही नियम नाही. मुळात पाठवण्यालासुध्दा नियम नाही. पण उध्दव ठाकरे यांनी या विषयात उगाचच तक्रारी केल्या आणि जणू निमंत्रण आलेलेच नाही असे आधीच भासवून भाजपाच्या विरोधात निवेदनेसुध्दा केली. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मुंबईत आले असताना बीडला निघून गेले.

पंतप्रधान मुंबईत येतात तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मुंबईत रहावे असा काही नियम नाही. ते आपला स्वतःचा कार्यक्रम आखण्यास मुक्त आहेत. मात्र शिवसेनेची नेमकी अडचण काय आहे हे लक्षात घ्यावे लागेल. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाजपेयी किंवा अडवाणी हे मुंबईत आले की मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत असत. शिष्टाचाराचा विचार करायचा तर वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणे गरजेचे नव्हते परंतु त्यांना मातोश्रीवरून निमंत्रण जात असे आणि बाळासाहेब ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून त्यांच्या भेटीला जाण्यात वाजपेयी आणि अडवाणी यांना कमीपणा वाटत नसे. पण आता हीच परंपरा कायम रहावी असा आग्रह उध्दव ठाकरे धरत असतील तर तो चुकीचा ठरेल. उध्दव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरे नव्हे. दोघांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा फरक आहे. परंतु शिवसेनेला अजूनतरी मोठ्या भावाची वागणूक मिळावी असे वाटते आणि ती मिळत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होत आहे. या भावनेतूनच शिवसेनेने गेल्या वर्षभरात सातत्याने भाजपाच्या विरोधात कारवाया सुरू केलेल्या आहेत. वर्षभर शिवसेनेने ज्या प्रकारचे वर्तन केलेले आहे त्याचा विचार केला तर त्यांना भाजपाकडून फार चांगल्या वागणुकीची अपेक्षा करता येणार नाही.

Leave a Comment