शिवसेना चितपट

sudhindra-kulkarni1
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महंमद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झालेल्या राजकारणात शिवसेनेचा पार पाणउतारा झाला आहे. पाकिस्तान विषयीचा द्वेष निर्माण करून आपले राजकारण साधण्याचा शिवसेनेचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला आणि कडक बंदोबस्तात पुस्तकाचे प्रकाशन घडवून आणले. शिवसेनेचा मुंबई हा बालेकिल्ला आहे. मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. अशा वातावरणात आम्ही मुंबईत काहीही करू शकतो हा शिवसेनेचा तोराही उतरला आहे. शिवसेनेचे नेते डावपेचाच्या राजकारणात कसे कमी पडतात आणि त्यामुळे येत्या काही वर्षात शिवसेनेचा प्रभाव कसा ओसरत जाणार आहे याची चुणूक या दोन दिवसातल्या घटनांनी दाखवून दिली आहे. कसुरी यांनी लिहिलेल्या, ‘नायदर अ हॉक, नॉर अ डोव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होऊ देणार नाही. ते आम्ही उधळून लावू या शिवसेनेच्या वल्गनातच मुळी अपरिपक्वपणा होता.

हे पुस्तक पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत या हेतूने लिहिलेले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे अशा वातावरणात पाकिस्तानातल्या एका लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन भारतात करावे की नाही असा प्रश्‍न बालबुध्दीच्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात निर्माण होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यावर विचार करताना अशी बालबुध्दी काही उपयोगाची नाही. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध नेमके कसे असावेत हा एखाद्या प्रादेशिक पक्षाचा विषय होऊ शकत नाही. आंतराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर शिवसेनेचे हे राजकारण अपरिपक्वतेचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कितीही तणाव असले तरी पाकिस्तानातला प्रत्येक माणूस भारतविरोधीच आहे आणि त्याला भारताचा शत्रूच मानले पाहिजे असे काही म्हणता येत नाही. त्याच चालीवर पाकिस्तानविषयी कटुतेने बोलतो, पाकिस्तानशी सतत निर्भत्सना करतो तोच भारतीय खरा देशप्रेमी होय असेही मानणे योग्य नाही. एवढी कटुता असली तरी भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हीच खरी राजनीती आहे. मात्र शिवसेनेला एवढा सखोल विचार करता येत नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करून आपला हिंदुत्ववाद दाखवून देण्याचा उथळ प्रयत्न शिवसेनेकडून नेहमीच होतो.

कै. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही तसा प्रयत्न झाला आणि त्यातला उथळपणा लक्षात न घेता आता हे उध्दव ठाकरे आणि परम आदरणीय आदित्य ठाकरे त्यांचाच कित्ता गिरवत आहेत. आपला हा कठोर पाकिस्तान विरोध म्हणजेच देशभक्ती हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री. अटलबिहारी वाजपेयी १९७७ साली भारताचे परराष्ट्रमंत्री झाले तेव्हा त्यांनी पाकिस्तान आणि चीनशी संबंधांच्या बाबतीत जे नवे पर्व सुरू केले त्याच्याशी शिवसेनेचे हे प्रयत्न विसंगत आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा कमी हिंदुत्ववादी आहेत असे तर कोणी म्हणणार नाही. कट्टर हिंदुत्वादी असलेल्या वाजपेयींना तर भारतातला पाकिस्तानद्वेष पराकोटीचा वाढवून आपला राजकीय फायदा करून घेता आला असता परंतु त्यांनी पाकिस्तानशी सगळ्या प्रकारचे संबंध वाढवले पाहिजेत अशी भूमिका घेतली आणि पाकिस्तानशी व्यापारी संबंध वाढवले. पाकिस्तानातले शासक हे भारताचा द्वेष करतात. कारण पाकिस्तानात भारतद्वेष करणारा एक वर्ग आहे. त्यांचा राजकीय दबाव असल्यामुळे पाकिस्तानात सत्तेवर येणार्‍या राज्यकर्त्यांना नेहमीच भारतद्वेषाचा वापर करावा लागतो.

असे असले तरी पाकिस्तानात मैत्रीचे संबंध असले पाहिजेत असे वाटणारा एक वर्ग आहे. भारताने त्यांच्याशी सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि राजकारण सोडता इतर सर्व क्षेत्रातले संबंध वाढवत नेले तर हे मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील आणि एक दिवस असा येईल की पाकिस्तानातले भारतद्वेष्टे निष्प्रभ होतील आणि भारताशी मैत्री करण्याची भावना बाळगणारे लोक प्रभावी होतील. तेव्हा या दोन देशातले संबंध सुधारायला सुरूवात होईल. या दोन शेजारी देशांमधील सहयोगाचे जीवन सुरू करण्याचा हाच एक परिपक्व मार्ग आहे. मात्र आपण भारतद्वेषाला पाकिस्तानद्वेषाने उत्तर दिले तर द्वेषाशिवाय काही वाढणार नाही. अर्थात शिवसेनेच्या उथळ नेत्यांना ही भूमिका पचनी पडणे फार अवघड आहे. तेवढी परिपक्वता त्यांच्यात नाही. त्यांना नेहमीच पाकिस्तानद्वेष वाढवत नेण्याचे राजकीय फायदे भुलवत असतात आणि त्यापायीच त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध केला. या कामी पुढाकार घेणार्‍या सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अशी भूमिका घेता आली नसती. त्यांनी सत्ताधारी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडली आणि शिवसेनेचा धिंगामस्तीचा अजेंडा धुळीला मिळवला. प्रकाशन समारंभ उधळून देण्याची वल्गना करणारी शिवसेना समारंभात काही करू शकली नाही म्हणून तोंडघशी पडली.

Leave a Comment