कलम ३७०

j&k
भारतीय घटनेमध्ये जम्मू काश्मिरला दिलेल्या विशेष दर्जाची तरतूद कलम ३७० मध्ये करण्यात आलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या तीन संस्थानांनी गुमानपणे भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्यामुळे वाद निर्माण झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जुनागड आणि हैदराबाद संस्थानचे प्रश्‍न मिटवले परंतु जम्मू काश्मीरचा प्रश्‍न पंडित नेहरुंनी हाती घेतला आणि तो नीट सोडवला नाही. परिणामी अजूनही जम्मू काश्मीर प्रश्‍न बनून राहिला आहे. घटनेच्या ३७० व्या कलमाने या राज्याला काही विशेषाधिकार दिले असून भारतातले कायदे त्यांना लागू होणार नाहीत असाही एक अधिकार त्यात आहे. कोणीही भारतीय नागरिक जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही.

घटनेत अशी तरतूद असली तरी हे ३७० वे कलम तात्पुरते असावे असे ठरले होते आणि सारा देश तसेच समजून चालला होता. कधी ना कधी तरी हे तात्पुरते कलम रद्द व्हावे आणि जम्मू काश्मीर हे देशातल्या अन्य राज्यांप्रमाणेच राज्य व्हावे अशी भारतातल्या जनतेची इच्छा आहे. परंतु जम्मू काश्मीरला दिलेले अधिकार हे मुस्लीम समाजाला दिलेले अधिकार आहेत, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. म्हणून देशातले कथित सेक्युलर पक्ष या कलमाला कधी विरोध करत नाहीत. तसा विरोध केल्यास मुस्लीम मतदार आपल्यावर नाराज होतील, अशी भीती त्यांना वाटते. मात्र भारतीय जनता पार्टीने सुरूवातीपासूनच या कलमाला विरोध केला आहे आणि ते रद्द व्हावे अशी मागणी केली आहे.

या संबंधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा काल निकाल झाला आणि या निकालात न्यायमूर्तींनी हे कलम तात्पुरते नसल्याचा निर्वाळा दिला आहे. हे कलम कायमचे आहे. त्यात कोणी बदल करू शकणार नाही आणि हे कलम रद्दही करता येणार नाही असे न्यायमूर्तींनी बजावले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या कलमाच्या विरोधाला जोरदार धक्का बसला आहे. अर्थात, असा धक्का बसला असला तरी उच्च न्यायालयाचा निकाल काही अंतिम नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि तिथे या कलमाचा अधिक खल होऊ शकतो. खरे म्हणजे हे कलम तात्पुरते की कायमचे हा न्यायमूर्तींच्या मताचा किंवा अभिप्रायाचा विषय कसा होऊ शकतो? ही तरतूद कायमची नसेल किंवा असेल तर तसे घटनेत स्पष्टच म्हटले गेले असेल. घटना समितीचे कामकाज उलगडून पाहिले की हे सरळच लक्षात येऊ शकते. तेव्हा याचा न्यायालयीन निकाल पाहण्यापेक्षा घटना समितीचे कामकाजाचा वृत्तांत पाहणे अधिक श्रेयस्कर ठरणार आहे.

Leave a Comment