जेठमलानी का चिडले?

ram-jethmalani
ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून काळ्या पैशाच्याबाबतीत आपली फसवणूक झाल्याची म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला परदेशातला काळा पैसा आणण्याच्या संदर्भात समिती स्थापन करण्याचा आदेश दिला. तोपर्यंतच्या काळात मनमोहनसिंग सरकारने असे आदेश मानले नव्हते आणि समिती नेमण्याच्याबाबतीत चालढकल केली होती. मोदी सरकारने मात्र तातडीने समिती नेमली आणि तेवढ्यावरून काळा पैसा भारतात आणण्याच्या बाबतीत आपण वेगाने हालचाली करत आहोत असा दावा केला.

त्यांच्या रागात काही अंशी तथ्य असल्याचे लक्षात येते. मोदी सरकारने समिती नेमली पण त्या नेमणुकीतून आपण जेवढ्या तातडीने हालचाली करत असल्याचा दावा केला तेवढ्याच तातडीने या प्रश्‍नात सरकारने पुढे काहीच केले नाही. परदेशात काळा पैसा ठेवणार्‍यांची नावे आता जाहीर होतील असे वाटण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली परंतु प्रत्यक्षात केवळ तीनच नावे जाहीर झाली. जेठमलानी यांच्या मते ही लपवाछपवी आहे आणि यासंबंधात अर्थमंत्री अरुण जेटली हे भूतपूर्व अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासारखेच आहेत आणि म्हणूनच जेठमलानी जेटलीवर बिघडले आहेत.

जर्मन सरकार तर काळा पैसा परदेशात नेऊन ठेवणार्‍या १४०० भारतीयांची नावे सांगण्यास तयार आहे. पण अरुण जेटलीच कायद्याचे बहाणे सांगून ही नावे जाहीर करण्याचे टाळाटाळ करत आहेत असाही जेठमलानी यांचा दावा आहे. सकृतदर्शनी अरुण जेटली ज्या कारणावरून नावे सांगण्याचे टाळत आहेत ती कारणे योग्यच वाटतात. पण ज्याअर्थी राम जेठमलानी यांचासारखा वयोवृध्द विधिज्ञ सरकारवर आरोप करत आहे त्याअर्थी त्याच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असलेच पाहिजे. नावे जाहीर करण्यात कायद्याच्या काही अडचणी असल्या तरी त्या अडचणींवर मात करून नावे जाहीर करणे शक्य असावे असे दिसते आणि तसे असल्यामुळेच जेटली नावे जाहीर करत नाहीत यावर जेठमलानी नाराज आहेत. एकंदरीत परदेशस्थ काळ्या पैशाचे गूढ कायमच गूढ होत चालले आहे.

Leave a Comment