उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला मानाचे पुरस्कार

maharashtra
नवी दिल्ली : महाराष्ट्राला उद्योगक्षेत्राच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासह अन्य महत्वाच्या पुरस्कारांनी देशात उद्योगप्रिय वातावरण निर्माण करणे आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

इस्टिट्यूट ऑॅफ कॉम्पेटेटिव्हनेस आणि मिंट माध्यम समुहाच्या वतीने येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मिंट माध्यमाचे संपादक सुकुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशात उद्योग पुरक वातावरण निर्माण करणा-या राज्यांनाही यावेळी विविध गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मेक इन इंडियाच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातील आपल्या प्रगतीसह देशातील उद्योग क्षेत्रात निखळ स्पर्धेसाठी तयार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या समारंभात केले.

देसाई म्हणाले, राज्यात उद्योग पुरक वातावरण तयार करण्यासाठी व कौशल्य आधारित रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेत स्वतंत्र विभागच तयार केला आहे. देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा ३० टक्के वाटा आहे, तर देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे. देशाच्या एकूण सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. कौशल्य विकासाच्यादिशेने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊले उचलले असल्याचेही त्यांनी सांगितले. या समारंभात देशात उद्योगप्रिय वातावरण निर्माण करणे आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्याबद्दल महाराष्ट्राला उद्योगक्षेत्राच्या पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५०० डॉलरपेक्षा जास्त दरडोई वार्षिक सकल उत्पन्न असणा-या राज्यांचा विचार या गटात केला जातो. याच गटात तामीळनाडुला दुस-या क्रमांकाचा तर गुजरातला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विविध उपगटात यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले एकुणात पहिल्या दोन क्रमांकावरील राज्यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. एकूण सर्व प्रकारात देशात ६९.३ गुणांसह महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकवले तर ६४.३५ गुणांसह आंध्रप्रदेश दुस-या स्थानावर आहे. उद्योगघटकांच्या स्थितीवर आधारित उपगटात ६४.३२ गुणांसह महाराष्ट्र प्रथम तर ६३.७४ गुणांसह तामीळनाडू दुस-यास्थानावर आहे. देशभरात आर्थिक स्थितीबाबत ७१.५० गुणांसह महाराष्ट्र प्रथम तर ६७.१४ गुणांसह कर्नाटक दुस-या स्थानावर आहे. संघटनात्मक सहकार्यात ७८.९४ गुणांसह तामीळनाडू प्रथम तर ७७.८९ गुणांसह महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे.

Leave a Comment