गुंतवणुकीत पहिला क्रमांक

investment
नुकताच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. भारताचे पंतप्रधान अन्य काही कारणाने अमेरिकेसारख्या मोठ्या देशात जातात आणि तिथे गुंतवणुकीवर चर्चा करतात तेव्हा देशाच्या या संबंधातल्या उणिवा आणि जमेच्या बाजू अशा दोन्हींचीही चर्चा होणे अपेक्षितच असते. तसे अमेरिकेत झालेही. भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण आहे. ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. परंतु अजुनही पायाभूत सोयींचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. प्रशासकीय सुधारणांचा वेगसुध्दा म्हणावा तेवढा वाढलेला नाही. या त्रुटीही समोर आल्या. मात्र असे असले तरीही भारतात गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झालेली आहे. भरपूर परदेशी गुंतवणूक म्हणून सारे काही नाही. पण बरेच काही आहे हे नाकारता येत नाही. २०१५ या आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात भारताचा क्रमांक सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आकृष्ट करणारा देश म्हणून पहिला आला आहे. याबाबतीत १६ देशांचे आकडे संबंधित जागतिक यंत्रणेने प्रसिध्द केले आहेत. त्यात भारताने चीनअ आणि अमेरिका यांच्याही पुढे मजल मारली आहे.

या सहा महिन्यात भारतात ३१ अब्ज डॉलर्स एवढी परदेशी गुंतवणूक आलेली आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये २८ अब्ज डॉलर्स तर जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणवणार्‍या अमेरिकेमध्ये २७ अब्ज डॉलर्स एवढीच परदेशी गुंतवणूक झालेली आहे. अमेरिकेमध्ये परदेशी गुंतवणूक फार होण्याचा प्रश्‍न निर्माण होत नाही आणि भारताची अमेरिकेशी तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा अमेरिकेच्या केवळ ४ अब्ज डॉलर्सनी पुढे असलो म्हणजे आपले हात आभाळाला टेकले असे होत नाही आणि आपण अमेरिकेच्या फार पुढे चाललो असाही त्याचा अर्थ होत नाही. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षभरापासून अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. तिथे व्याजाचे दर नेमके किती राहणार याबाबतीत गेल्या वर्षभरापासून केवळ अटकळी बांधल्या जात आहेत. तिथे व्याजाचा दर अर्धा किंवा एक टक्क्याने कमी होणे हे तिथल्या अर्थव्यवस्थेसाठी फार काही आहे आणि त्यामुळेच जी अनिश्‍चितता निर्माण झाली तिचा काही एक परिणाम नक्कीच अमेरिकेच्या गुंतवणुकीवर झालेला आहे. म्हणजे या सहा महिन्यात भारताने अमेरिकेच्या काही प्रमाणात पुढे असणे हे फार मोठे देदिप्यमान यश आहे असे म्हणता येत नाही, कारण तो अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेच्या स्थानिक घटकांचा आणि तात्पुरता परिणाम आहे.

मात्र तो आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. काही काळाकरिता का होईना आपण काहीतरी अमेरिकेपेक्षा चांगले केलेले आहे ही गोष्ट धन्यतेचीच आहे. पण चीनपेक्षा आपण आघाडीवर आहोत ही गोष्ट निश्‍चितच चीनला विचार करायला लावणारी आहे. कारण आपण चीनवर घेतलेली आघाडी अशीच स्थानिक कारणांमुळे घेतलेली आणि तात्पुरत्या स्वरूपाची नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेचा कृत्रिमरित्या फुगवलेला फुगा फुटत चालला असल्याचे ते द्योतक आहे. आपण अमेरिकेच्या पुढे आहोत का याच्यापेक्षा चीनपेक्षा पुढे आहोत की नाही याला महत्त्व आहे. जगभरातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्‍वास वाढत चालला असल्याचेही हे द्योतक आहे. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जी आर्थिक धोरणे अवलंबिली त्यांचा या यशात मोठाच वाटा आहे आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे म्हटलेही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या परदेश दौर्‍यावर नाकडोळे मोडणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदींच्या दौर्‍याचे हे फलित डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे.

नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौर्‍यात किती दिवस खर्ची पडले, त्यावर किती खर्च झाला आणि त्यामुळे देशाच्या कारभारावर किती परिणाम झाला याचे चर्वितचर्वण करणारे करू देत पण मोदींचे दौरे फलदायी ठरत आहेत हे या आकड्यावरून दिसत आहे. मोदी भारताचे मार्केटिंग परदेशात करतात तेव्हा ते देशापेक्षा स्वतःचेच मार्केटिंग जास्त करतात असा टीकेचा सूर काही नतद्रष्ट कॉंग्रेसवाल्यांनी लावला आहे. परंतु त्यात काही तथ्य नाही. कारण या दौर्‍यात मोदींचे मार्केटिंग झाले असते तर मोदींची गुंतवणूक वाढली असती. मोदींच्या घरी काही गुंतवणूक झालेली नाही. जी झाली ती गुंतवणूक देशात झाली आहे आणि हातच्या काकणाला आरसा कशाला या न्यायाने स्वच्छ मनाने कोणी पाहिले तर त्याला ही गोष्ट स्पष्टपणे दिसायला काही हरकत नाही. मात्र या निमित्ताने मोदींचे मार्केटिंग झाले तर आपल्या पोटापाण्याचे काय होईल याची चिंता काही लोकांना लागली आहे आणि त्यांनीच मोदींच्या परदेश दौर्‍यावर आगपाखड करायला सुरूवात केली आहे. मोदींनी केले तेवढे परदेश दौरे आजवर कोणी केले नाही. ही गोष्ट खरी असली तरी पंतप्रधानांनी किती दिवस परदेश दौरे करावेत याबाबत कसला कायदा नाही आणि घटनेनेही तसे म्हटलेले नाही. सगळेच पंतप्रधान तोलूनमापून सारखेच दिवस परदेश दौरे करतील असे काही सांगता येत नाही. सध्या आपल्याला मनमोहनसिंग सरकारच्या वाईट कामगिरीनंतर चांगले काही करायचे असेल तर हे दौरे आवश्यकच आहेत.

Leave a Comment