माहिती तंत्रज्ञानाचे मार्केटिंग

modi
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अमेरिकेत भारताचे मार्केटिंग करताना माहिती तंत्रज्ञानावर भर दिला. आपला देश तीन पातळ्यांवर प्रगती करीत आहे यावर त्यांनी भर दिला. जॅम असे नामकरणही केले. जन धन, आधार आणि एम गव्हर्नन्स. या तिन्ही कामांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर होतो. भारत महाशक्ती कधी होईल हे सांगता येत नाही पण हा देश माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली महाशक्ती होणे काही फार अवघड नाही. मोदी यांनी अमेरिकेतल्या या क्षेत्रातल्या प्रमुखांना ही गोष्ट पटवून दिली. मुळात ते अमेरिकेला संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीला गेले होते. तिथे त्यांनी भारताची चांगली वकिली केली. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा कायम सदस्य का होता येत नाही असा सवाल त्यांनी केला. साधारणत: या पदासाठी इच्छुक असलेला देश आर्थिकदृष्ट्या संपन्न असावा असा संकेत आहे. भारत देश त्या मार्गावर जात आहे. चीनने हे स्थान निर्माण केले होते पण आता आता चीनच्या अर्थव्यवस्थेचे गुपित कळायला लागले आहे. शेवटी हुकूमशाही राजवटीत असेच होते.

रशियाचेही असेच झाले. अर्थव्यवस्था मुक्त पण प्रशासनात पोलादी पडदा हा प्रयोग रशियातही यशस्वी झाला नाही आणि चीनमध्येही तो तसा होत नाही असे दिसायला लागले आहे. त्यामुळे भारताची रेषा आपोआपच मोठी दिसायला लागली आहे. ती सर्वांना दाखवून देण्याचे काम मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांत केले. जमाना बदलला तरीही यूनोचे नियम तेच आहेत ही विसंगती त्यांनी दाखवून दिली. त्यातल्या त्यात भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे ही गोष्ट त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिली. आता लगेच भारताला सुरक्षा समितीत जागा मिळणार नाही पण ती मिळावी यासाठी जागतिक स्तरावरचा अन्य देशांचा पाठींबा वाढत आहे. भारताचे हे प्रयत्न आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्याच्या प्रयत्नांशी समांतर चालले तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. तसे पाहिले तर सुरक्षा समितीतले कायम सदस्यत्व हा केवळ एक मान आहे आणि त्याचा तसा गरिबी हटवण्यासाठी काही फायदा नाही. जगाच्या राजकारणात आपल्याला नकाराधिकार वापरता येईल पण आर्थिक उन्नतीसाठी काही एक फायदा नाही. याचा अर्थ ते स्थान अनावश्यक आहे असा नाही. आर्थिक उन्नतीने आपण महाशक्ती होण्यास लायक होणार आहोत आणि सुरक्षा समितीतले ते स्थान म्हणजे आपण महाशक्ती होण्यावर शिक्कामोर्तब आहे. म्हणून मोदी यांनी आपल्या अमेरिका दौर्‍यात भारताचे मार्केटिंग जोरदारपणे केले.

मोदींच्या परदेशा दौर्‍यांचे फलित काय असा सवाल करून काही वाहिन्यांनी त्यावर चर्चा घडवली आहे पण मार्केटिंगच्या प्रयत्नांत लगेच असे प्रश्‍न विचारले जात नाहीत. आज जाहीरात केली आणि उद्या ग्राहकांची रांग लागली असे कधीच होत नाही. मार्केटिंग ही एक पेरणी आहे. उगवायला वेळ लागतो. पण मार्केटिंग योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने झाले आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला हजर रहात असतानाच माहिती तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या सिलिकॉन व्हॅलीला भेट देऊन मोदी यांनी जाता जाता असे मार्केटिंग केले आहे. याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हेही याच बैठकीसाठी अमेरिकेला भेट दिली होती. पण त्यांनी जनसभेला संबोधित करण्याचा असा काही उपक्रम केला नाही. केवळ शरीफच काय पण अन्यही अनेक देशांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते पण त्यांनी बैठक आटोपल्यानंतर आपल्या ेदेशातली परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी असा काही प्रयत्न केला नाही. पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनी तर शरीफ आणि मोदी यांच्या दौर्‍यातला फरक दाखवून दिला असून शरीफ यांनी मोदींपासून काही तरी शिकले पाहिजे असे म्हटले आहे.

खरेच शरीफ यांनाही परदेशी गुंतवणुकीची गरज आहे पण त्यांनी आपल्या या दौर्‍याचा फायदा घेऊन गुंतवणुकीसाठी काही प्रयत्न केलेले नाहीत. मोदी यांनाच असे का वाटले? यात मोदी यांचे वैशिष्ट्य आहे. मोदींनी या दौर्‍यात अमेरिकेतल्या माहिती तंत्रज्ञानावर भर दिला. तसा त्यांनी अन्यही क्षेत्रातल्या गुंतवणुकीविषयी चर्चा केली आहेच पण त्यांचा भर माहिती तंत्रज्ञानावर होता. हे पाहिले म्हणजे आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे लक्षात येते कारण माहिती तंत्रज्ञानाला भारताच्या संदर्भात मोठे महत्त्व आहे. यापूर्वीच नॅसॅकॉम सारख्या संस्थांनी भारताचे या क्षेत्रातले मार्केटिंग चांगले केले आहे. त्यामुळेच भारतात ३९ लाख लोक या क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळवून देशाच्या संपन्नतेत भर टाकत आहेत. खरे तर आपल्याला हे क्षेत्र बरेच मुक्त आहे. भारताला या क्षेत्रात जेवढे काम करता येणे शक्य आहे त्याच्या ३० टक्केही आपण अजून पटकावलेले नाही. या क्षेत्रात आपण अजून याच्या तिप्पट रोजगार निर्मिती करू शकतो. आताच आयटी मधील उच्च उत्पन्न गटामुळे समाजात किती संपन्नता दिसत असते हे आपण पहात आहोतच पण सारी क्षमता पणाला लावून आपण कामाला लागलो तर मोठे आर्थिक परिवर्तन शक्य आहे. या क्षेत्रात तुलनेने कमी गुंतवणुकीत मोठी उलाढाल होते. गुंतवणुकीचा परतावा काही महिन्यांतच मिळतो आणि या क्षेत्रात प्रदूषण होत नाही.

Leave a Comment