मर्सिडीजच्या १००० कोटीच्या अतिरिक्‍त गुंतवणूक प्रकल्पास मंजुरी – मुख्यमंत्री

bez
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मर्सिडीज बेंझच्या महाराष्ट्रातील १००० कोटीच्या अतिरिक्त गुंतवणूक प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांना मर्सिडीज बेंझचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक रोलॅण्ड फॉल्गर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, औद्योगिक गुंतवणुकीस राज्यात पोषक वातावरण असून मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात आरामदायी कार निर्मितीचा १००० कोटी रुपये गुंतवणुकीचा अतिरिक्त प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पास त्वरीत मंजुरी देण्यात येईल. मर्सिडीज बेंझ कंपनीने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक करुन या महत्वाकांक्षी उपक्रमात आणि कौशल्य विकास कार्यक्रमात कंपनीतर्फे योगदान देण्यात येईल, असा मनोदय मर्सिडीज बेंझचे व्यवस्थापकीय संचालक रोलॅण्ड फॉल्गर यांनी यावेळी व्यक्त केला. मर्सिडीज बेंझचे माजी व्यवस्थापकीय संचालक एव्हरहार्ड कर्ण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

Leave a Comment