मंगळावरील पाण्याला गूगलचे डूडल!

google
न्यूयॉर्क : नुकताच नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर पाणी असल्याचा दावा केला आहे. या संशोधनाची गूगलनेही दखल घेतली आहे. सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींवर डूडलच्या माध्यमातून प्रकाश टाकणाऱ्या गूगलने या शोधावरही कल्पक डूडल सादर केले आहे.

मंगळालाचे ग्लासमधून स्ट्रॉच्या सहाय्याने पाणी पिताना गूगलच्या होम पेजवर दाखवण्यात आले आहे. डूडलवर क्लिक केल्यानंतर या शोधासंबंधी अधिकची माहिती गूगलतर्फे युजर्सना पुरवण्यात आली आहे. पृथ्वीबाहेरील ग्रहांवर जीवसृष्टी शोधण्याच्या दिशेने नासाने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मंगळावरुन आलेल्या फोटोंमधून ग्रहावर वाहत्या पाण्याचे नमुने आढळल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याची माहिती नासाच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.

मंगळावरील भूपृष्ठाच्या उंच भागांवर दिसणारा पदार्थ मीठसदृश्य असल्याचे नासाने म्हटले आहे. विरळ हवा असलेल्या मंगळ ग्रहावर हे मीठ पाणी गोठण्याच्या आणि बाष्पीभवन होण्याच्या तापमानात बदल करु शकते. यामुळे पाणी प्रवाही राहण्याच्या कालावधीत वाढ होऊ शकते. संशोधनामुळे मार्स एक्स्प्लोरेशन प्रोगामबाबत नासाच्या मोहिमेला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. वैज्ञानिक लुजेंद्र ओझा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नॅचरल जिओसायन्स जनरलमध्ये हे संधोधन प्रकाशित केले आहे. यामुळे मंगळावर जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेच्या दिशेने अधिक संशोधन करण्यास वाव निर्माण झाला आहे. पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असल्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पाण्याचा शोध भविष्यातील मंगळावरील मोहिमांच्या दृष्टीने वास्तव्यासही अनुकूलता दर्शवतो.

Leave a Comment