मराठी सक्तीचीच हवी

marathi
आपल्या राज्यात प्रादेशिक भाषेची सक्ती करण्याचा पायंडा जवळपास सर्वच राज्यांत असतो. तामिळनाडूतले लोक तर आपल्या भाषेविषयी किती आग्रही असतात याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. काही तामिळ लोक तर आपल्या भाषेच्या आग्रहासाठी इतर भाषांचा अवमान करायलाही मागेपुढे पहात नाहीत. याबाबत आपण मराठी लोक फारच मवाळ. पण आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा मवाळपणा सोडून दिला आहे. महाराष्ट्रात रहायचे आणि रिक्षा चालवून पोट भरायचे असतील तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा इशारा त्यांनी परराज्यातून येणार्‍या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना दिला आहे. आपण ज्या गावात किंवा राज्यात रहातो त्या गावाची भाषा आपल्याला आली पाहिजे असे कोणी म्हटले तर त्यात चूक काय आहे ?

असे म्हणण्यात राष्ट्रभाषेचा किंवा कोणत्याही अन्य भाषेचा अपमान होण्याची काही शक्यता नाही. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतोच. त्यामुळे कोणाचा अपमान होण्याची काही गरजही नाही. काही पथ्ये पाळून भाषेचा आग्रह धरण्यात काही चूक नाही. शिवाय आपण पोटापाण्यासाठी दुसर्‍या राज्यात राहत असू तर तिथे आपल्या घरात आपली मातृभाषा वापरण्यात काही चूक नाही. परंतु त्या राज्यात सामान्य माणसांशी दैनंदिन व्यवहार करताना आपल्या तिथली भाषा वापरता आली पाहिजे. तिथे आपण त्या भाषेचा दुःस्वास करतो हे विकृतीचे लक्षण आहे. महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा परंतु मराठी भाषेला शिव्या द्यायच्या अशा लोकांना फटकेच मारले पाहिजेत.

एकवेळ ही भाषा येत नाही असे म्हटले तर ठिक आहे. ती भाषा मी शिकून घेईन असे म्हणणेही शहाणपणाचे लक्षण आहे. परंतु त्या भाषेचा द्वेष करणे किंवा ती भाषा आपल्याला येत नाही. याचा अभिमानाने उल्लेख करणे हे चूक आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा भाषा विवेक महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना शिकवायचे ठरवले आहे. मराठी भाषा आल्याशिवाय त्यांना टॅक्सी किंवा रिक्षाचा परवानाच मिळणार नाही असा दंडक त्यांनी केला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Leave a Comment