गायाळांची गाथा

cow
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिमांसाठी असलेल्या संघटनेने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात गायीसंबंधी पुन्हा तेच धादांत असत्य दावे केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर या लोकांनी पुन्हा एकदा गायाळपणाचे प्रदर्शन घडवले आहे. महाराष्ट्रात गोवध बंदीचा कायदा झाला तेव्हा या विषयावर खूप चर्चा झाली आहे. या कायद्याला विरोध असणारांनी गाय हा अन्य पशुंप्रमाणेच एक प्राणी आहे तेव्हा इतर पशुंप्रमाणेच वागवले जावेे असे मत मांडले आहे. पण समर्थकांनी गाय हा मोठाच अद्भुत प्राणी असल्याचे दावे करायला सुरूवात केली. त्यासाठी अनेक खरी खोटी गणिते मांडली. काही समर्थकांनी तर आपली सारी गणिते सर्वोच्च न्यायालयालाही मान्य असल्याचे अतिशयोक्तीपूर्ण दावे केले. त्या दाव्यांत तर्कशुद्धता नसते. समर्थकांचे दावे कितीही अतार्किक असले तरीही राज्य सरकार काही आपला कायदा मागे घेणार नाही कारण हा कायदा करणे ही भारतीय जनता पार्टीची कथित वैचारिक अपरिहार्यता आहे.

१९६६ पर्यंत भारतीय जनसंघाला काही देशात बरे दिवस आलेले नव्हते. तेव्हा एका शंकराचार्यांनी दिल्लीत गोवध बंदीच्या मागणीसाठी ६४ दिवस उपोषण केले. तरीही सरकारने हा कायदा केला नाही पण त्यावरून उत्तर भारतात हिंसाचार झाला. त्यात भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्यातून लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि १९६७ पासून जनसंघाला उत्तर भारतात स्थान मिळायला सुरूवात झाली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता गोवध बंदी करणे ही बाब आपल्या पक्षाच्या मूलभूत विचारांचाच एक भाग वाटतो. तेव्हा आता याबाबत सरकार कधीच तर्कशुद्ध वगैरे विचार करणार नाही.

जी अवस्था भाजपाची तीच संघ परिवारातल्या असल्या संघटनांची आहे. गोवध बंदीबाबत कसलीही चर्चा करायला ते तयारच होणार नाहीत. उलट गाय हा कसा अद्भुत गुणधर्म असलेला प्राणी आहे हे सांगायला लागलो तर ते आवर्जुन ऐकून घेतील. गोवध बंदीच्या बाबतीत देशात दोनच टोके आहेत. नि:पक्षपातीपणाने काही सांगणारे कोणीच नाहीत. आणि तसे कोणी काही सांगायला लागले तर परिवारातले लोक ते ऐकूनही घेणार नाहीत म्हणून परिवारातल्या संघटना परस्परांना गायीच्या संबंधाने काहीही भाकड कथा सांगून आपला गोवध बंदीचा निर्णय कसा बरोबर आहे हे सांगत आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे. आता प्रसृत करण्यात आलेल्या भाकड कथेत गायीचे शेण अणुबॉंबलाही निष्प्रभ करते अशी थाप मारण्यात आली आहे.