ब्रॉडबॅण्ड विस्तारात भारताची घसरण; जगात १३१ वा क्रमांक

broadband
नवी दिल्ली : भारत जागतिक स्तरावर ब्रॉडबँडच्या विस्तारात अयशस्वी ठरल्यामुळे भारताची १३१ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मात्र देशाअंतर्गत इंटरनेटचा वापर तुलनेने वाढला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून पुढे आली आहे.

शिखर संमेलनात ब्रॉडबँडच्या विकासात्मक भूमिकेचा आढावा घेण्यात येणार आहे. यासंबंधी २६ सप्टेंबर रोजी ब्रॉडबँड आयोगाची समांतर बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाने हा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार अजूनही जगातील ५७ टक्के लोकसंख्या इंटरनेटशी जोडली गेलेली नाही. त्यामुळे ते इंटरनेटद्वारे उपलब्ध विशाल आर्थिक तथा सामाजिक लाभ घेण्यात अयशस्वी ठरले आहेत. भारत २०१४ मध्ये फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहकांच्या तुलनेत जगातील १८९ देशांच्या तुलनेत १३१ व्या स्थानावर राहिला. मात्र, गेल्या वर्षीच्या ग्राहकसंख्येच्या तुलनेत १२५ व्या क्रमांकावर आहे. याबरोबरच मोबाईल ब्रॉडबँड ग्राहक संख्येच्या तुलनेत भारत १५५ व्या स्थानावर आहे. २०१३ मध्ये भारत ११३ व्या क्रमांकावर होता. व्यक्तिगत इंटरनेट वापरात भारत २०१४ मध्ये १३६ व्या क्रमांकावर होता आणि १८ टक्के लोक इंटरनेटचा वापर करीत होते. मात्र, या प्रकारात भारत २०१३ मध्ये १४२ व्या क्रमांकावर होता आणि १५.१ टक्के लोक इंटरनेटचा वापर करीत होते. इंटरनेटचा वापर करणा-या कुटुंबियांच्या तुलनेत भारत १३३ विकसनशील देशांत ८० व्या क्रमांकावर आहे आणि या कुटुंबियांची संख्या १५.३ टक्के आहे. याच प्रकारात भारत २०१३ मध्ये ७५ व्या क्रमांकावर होता आणि १३ टक्के कुटुंबिय इंटरनेटचा वापर करीत होते. नव्या अहवालात सध्या जगात ३.२ अब्ज लोक संपर्क साधण्याच्या सुविधेशी जोडले गेले आहेत. गतवर्षी ही संख्या २.९ अब्ज होती. ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या ४३ टक्के आहे. भारत ब्रॉडबँड विस्तारात घसरला असला, तरी देशाअंतर्गत इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात ही संख्या वेगाने वाढत आहे. परंतु जगाच्या तुलनेत याचे प्रमाण काही अंशी कमी आहे. यात दिवसेंदिवस वाढ मात्र कायम आहे. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment