बंदी निरर्थक ठरेल

santan
महाराष्ट्रात सनातन संस्थेवर बंदी घालावी की नाही यावर आता वादविवाद जारी आहे. परंतु अशी बंदी घातल्याने काय निष्पन्न होणार आहे हे काही कळत नाही. कारण बंदी संघटनेवर घातली जाते. विचार मात्र जिवंत राहतो. जोपर्यंत विचाराने विचाराशी सामना केला जात नाही तोपर्यंत तो विचार संपत नाही. म्हणून संघटनेवर बंदी घालण्यापेक्षा त्या संघटनेमागचा घातक विचार संपवण्याचा विचार केला पाहिजे. यापूर्वीच्या काळामध्ये काही संघटनांवर बंदी घालण्याचे प्रयोग झाले. पण त्यातून काही साध्य झाले नाही. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी तर अशा मागणीचा जोरच लावला आहे. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या बंदीचे समर्थन केले आहे.

तथापि या संघटनेवर आजपर्यंत बंदी आली नाही याला केंद्रातले कॉंग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे आता निष्पन्न होत आहे. या संघटनेच्याविरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. तिच्यामध्ये सनातन संस्थेच्या सनातन प्रभात या मुखपत्रातून केल्या जाणार्‍या विषारी प्रचाराचा संदर्भ देण्यात आला आहे. तो योग्य वाटतो. ज्या लोकांनी सनातन प्रभात हे वृत्तपत्र वाचले असेल त्यांना याची कल्पना येऊ शकते. या प्रचारामध्ये काही वेळा तर हिंसेची उघड चिथावणी दिलेली दिसते. त्याचा परिणाम काही तरुणांच्या मनावर होऊ शकतो आणि त्यातूनच या हत्या झाल्या असाव्यात असा तर्क करण्यास पुरेशी जागा आहे.

रुद्र पाटील हा दाभोळकर, पानसरे यांच्या तसेच कर्नाटकातील विचारवंत प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचे दिसत असले तरी त्याचा सनातनशी २००९ सालपासून काही संबंध नाही असा खुलासा सनातन संस्था करत आहे. परंतु या खुलाशाने सनातनची जबाबदारी टळत नाही. त्याची प्रेरणा सनातनच्या विचारातून आली आहे की नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यापेक्षाही सनातनच्या दैनिकातून व्यक्त होणारे विचार किती घातक असतात ही गोष्ट महत्त्वाची आहे. यापूर्वीही काही स्फोटांच्या प्रकरणांमध्ये सनातनचेच कार्यकर्ते गुंतलेले होते. अशा वातावरणात या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली तर ती अवाजवी नव्हे. पण दूरगामी दृष्टीने विचार केल्यास संघटनांवर बंदी घालण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा प्रतिकार करणेच अधिक श्रेयस्कर असल्याचे लक्षात येते.

Leave a Comment