एस टीचा तोटा

st
महाराष्ट्रातील सामान्य प्रवाशांचे सर्वाधिक आवडीचे प्रवासी वाहन म्हणजे एस टी बस पण एस टी बसची सेवा किती चांगली वाटली तरी ती परिणामी तोट्यात जाणारी ठरली आहे. कारण गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील प्रवाशांची एस टी ने प्रवास करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. २०१३-१४ या वर्षापेक्षा १४-१५ या वर्षात ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे एस टी महामंडळाचा तोटा जारी आहे. या वर्षात महामंडळाला किती तोटा झाला याची काही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र महामंडळाचा संचित तोटा १९३४ कोटी रुपये इतका आहे. यामुळे एस टी महामंडळ तोट्यात चालते या जनतेच्या समजाला बळकटी मिळते.

१९९० सालपासून एस टी महामंडळाच्या तोट्याविषयी सातत्याने चर्चा होत आलेली आहे. महामंडळ हे सरकारच्या अंगिकृत व्यवसायाच्या स्वरूपात चालवले जाते. त्यामुळे ते व्यावसायिकदृष्ट्या ते चालवता येत नाही. ती एक सेवा म्हणून चालवली जाते म्हणूनच ती तोट्यात असते. असे तोट्याचे समर्थन केले जात असे. मात्र मुक्त अर्थव्यवस्था आल्यापासून एस टी महामंडळसुध्दा व्यावसायिक झाले आहे. मग व्यावसायिक तत्वावर चालवूनसुध्दा त्याला तोटा का होतो हा प्रश्‍न शिल्लकच राहतो. पूर्वी असे म्हटले जात होते की डिझेलचे दर कितीही वाढले तरी एस टी चे दर वाढत नाहीत. त्यामुळे एस टी तोट्यात जाते. मात्र गेल्या काही वर्षात एस टीने डिझेलच्या प्रत्येक दरवाढीबरोबर तिकिट दरही वाढवले आहेेत. आज महाराष्ट्रातल्या कित्येक मार्गावरचे एस टीचे प्रवास बरेच महाग झालेले आहेत. तेव्हा अंगिकृत व्यवसायाप्रमाणे काम न करता व्यावसायिक तत्वावर काम करून दरवाढ करूनसुध्दा एस टीला तोटा का व्हावा?

पूर्वी एस टीचे एक समर्थन केले जात असे. काही खासगी आरामगाड्या फायद्यात चालतात तर एस टी का चालत नाही असा प्रश्‍न विचारला की उत्तर तयार असायचे. खासगी आरामगाड्या मोठ्या शहरांच्या दरम्यानच धावतात पण एस टीला मात्र रस्ता चांगला असो की नसो खेड्यापर्यंत जावे लागते आणि एस टी महामंडळाचे ग्रामीण भागातले हे मार्ग तोट्यात जातात. पण हेही समर्थन आता पटत नाही. कारण आता खेड्यापाड्यापर्यंत चांगले रस्ते झालेले आहेत. पूर्वीची स्थिती राहिलेली नाही. एस टी महामंडळाने इतर अनेक उपक्रमातून आणि बसस्थानके व्यावसायिकदृष्ट्या विकसित करून आपले उत्पन्न वाढवायला हवे होते. त्यांची फक्त चर्चाच झाली. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. परिणामी तोटा वाढत आहे.

Leave a Comment