गूढावर प्रकाश पडणार ?

netaji-subhashchandra-bose
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतात तरुणांचा गळ्यातला ताईत म्हणावे एवढे लोकप्रिय होते. स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात भारताच्या सर्व प्रांतांत लोक आपल्या मुलाचे नाव आवडीने सुभाष असे ठेवत असत. नेहरू आणि नेताजी ही जोडी लोकांना भारताचे भवितव्य घडवणारे भाग्यविधाते म्हणून परिचित होती. पण या दोघांचे मार्ग भिन्न होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपण ब्रिटीशांचे शत्रू म्हणवल्या जाणार्‍या देशांची मदत घेतली पाहिजे असे नेताजींचे मत होते. नेहरू मात्र गांधी मार्ग धरून चालले होते. नेताजी जर्मनी आणि जपान यांची मदत घेण्यासाठी भारतातून गुप्त झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या वातावरणाचा आपण लाभ घेतला पाहिजे अशी त्यांची रणनीती होती. त्यांनी जपानची मदत घेऊन आग्नेय आशियातल्या भारतीय सैनिकांना संघटित केले आणि त्यातून आझाद हिंद सेना स्थापन करून ते जपानच्याच मदतीने ब्रिटीश भारतावर चालून आले. त्यांनी ही लढाई जिंकत आणली होती आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा ब्रिटीशांचा ध्वज तेच उतरवणार असे दिसायला लागलेे. पण विजयाचा प्याला तोंडावर येणार तोच दगलबाजीने त्यांचा घात केला. नंतर त्यांना पलायन करावे लागले. याच प्रयत्नात त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही सुभाष गाथा आहे. पण या सार्‍या प्रकरणात काही पण आणि परंतु आहेत.

काही लोकांचा असा दावा आहे की, ते मरण पावलेच नाहीत. त्यांनी आपल्या मृत्यूचा देखावा उभा केला. प्रत्यक्षात ते नंतर बरीच वर्षे हयात होते. पण ते हिमालयात एका साधूच्या वेषात वावरत होते. कारण त्यांनी या सार्‍या प्रयत्नात हिटलरला मदत केली होती. म्हणजे दुसर्‍या महायुद्धात विजयी ठरलेल्या रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचा त्यांनी अपराध केला होता. अशा युद्धानंतर अशा नेत्यांना युद्ध गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर खटले चालवले जातात. असा खटला हिटलरवर प्रामुख्याने चालवला गेला असता पण त्याने अशा खटल्याच्या कल्पनेनेच शहारून आपले जीवन आपल्याच हाताने संपवले. सुभाष बाबूंनाही अशीच भीती वाटत असावी म्हणून त्यांनी दुसरे महायुद्ध संपल्यावर प्रकट न होता साधूच्या वेषात राहणे पसंत केले. त्यांनी कोणालाही आपली ओळख दिली नाही. काही लोक त्यांना पाहिल्याचे सांगतात. काही लोकांकडे तर अशी मागणी आहे की नेताजींनी नेहरूंना आपण हयात असल्याचे कळवले होेते आणि भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती पण नेहरूंनी त्यांना प्रतिसाद दिला नाही अशी चर्चा आहे.

नंतर अशीही चर्चा सुरू झाली होती की, नेहरू नेताजींना घाबरत असत आणि ते जर प्रकट झाले तर त्यांनाच आपल्यापेक्षा लोकप्रिय होऊन पंतप्रधान होतील आणि आपले पद जाईल अशी भीती त्यांना वाटत होती म्हणून त्यांनी नेताजींना प्रकट न होण्याचा सल्ला दिलाच पण नेताजी या शिवाय अन्य काही मार्गांनी तसा प्रयत्न करतील म्हणून त्यांच्यावर पाळतही ठेवली. तसा काही प्रयत्न केला असता तर तो आपल्या कुुटुंंबियांच्याच माध्यमातून केला असता म्हणून नेहरूंनी नेताजींच्या कुटुंबियांवरही पाळत ठेवली. नेताजींचे व्यक्तिमत्त्व जबरदस्त होते. पण त्यांच्या निमित्ताने सारे गूढच निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यापासून त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली. या मागणीला नेहरू विरोधाची किनार होती. त्यामुळे गांधंी नेहरू घराण्याला खिजवण्याची एक संधी म्हणूनही त्याकडे पाहिले जात असे. अनेकदा अशी मागणी करूनही सरकारने त्यावर एक कमीशन नेमण्यापलीकडे काही केले नाही. या कमीशननेही नेताजी हयात नाहीत असाच निष्कर्ष काढून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसे झाले असले तरी नेताजी हयात असल्याच्या पुराव्याचे काय हा प्रश्‍न अनुत्तरितच राहिला.

मराठीत नेताजींचे मोठे चरित्र लिहिणारे लेखक विश्‍वास पाटील यांनी जपानमध्ये जाऊन त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला आसून त्यांनीही नेताजींचा मृत्यू अपघातातच झाला असल्याचा निर्वाळा दिला आहे. पण आता नेताजींच्या संबंधातल्या आजवर गोपनीय असलेल्या सरकारी फायलींचा एक गठ्ठा खुला झाला आहेे. प. बंगाल सरकारने त्यांच्याकडे असलेल्या फायली खुल्या केल्या आहेत. या फायलीत काय आहे आणि त्यातून नेताजींच्या जीवनाविषयीच्या गूढावर प्रकाश पडणार आहे का हे येत्या काही दिवसांत कळणार आहे. केन्द्र सरकारकडेही अशा काही फायली आहेत पण अजून तरी केन्द्राने त्या फायली मोकळया केलेल्या नाहीत. प. बंगालच्या मागोमाग आता केन्द्रानेही त्या खुल्या कराव्यात अशी मागणी होत आहे. पण आधी बंगालच्या फायलीत काय दडले आहे याचा उलगडा झाला पाहिजे. हे गूढ उलगडण्याचा आता काही फायदाही नाही कारण नेताजी अपघातात मरण पावलेले नाहीत असे सिद्ध झाले तरी ते आता हयात असण्याची शक्यता नाही. मात्र या प्रकरणाची उत्सुकता मोठी आहे हे नाकारता येत नाही. या फायलीतून अन्यही काही माहिती प्रकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Leave a Comment