परकीय गुंतवणुकीची उडी

modi1
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी परदेशी दौर्‍यांचा सपाटा लावला होता तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांनी कधीतरी भारतातही यावे असे विनोदही राहुल गांधी यांनी केले. हाही प्रकार विरोधी पक्ष म्हणजे काय याच्या गैरसमजुतीतून निर्माण झालेला होता. सरकारने काहीही केले तरी त्याला विरोध करणारा तो विरोधी पक्ष अशी ही कल्पना होती. पण मोदीनी त्या त्या देशाच्या दौर्‍यावर असताना आपला दौरा कशासाठी आहे याची स्पष्ट जाणीव करून दिलेली होती. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करायची असेल तर परदेशी गुंतवणुकीला पर्याय नाही आणि आपण याच कामासाठी दौरे करीत आहोत हे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या म्हणण्याचे आता प्रत्यंतर येत आहे.

मोदी आता अमेरिकेच्या दौर्‍यावर जात आहेत आणि या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या आधीच्या अमेरिका दौर्‍याचे फलित काय याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. गेल्या एका वर्षात मोदींच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून भारतात अमेरिकेची १४५ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक झाली आहे. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या झालेल्या तीन वर्षातल्या गुंतवणुकीपेक्षा ही मोदी यांनी आणलेली एका वर्षातली गुंतवणूक जास्त आहे. ही केवळ अमेरिकेची गुंतवणूक आहे. जपानची तर यापेक्षा अधिक गुंतवणूक अपेेक्षित आहे. भारतात अनेक शहरांत मेट्रो रेल्वे आणि बुलेट ट्रेन या प्रकल्पांत जपानची मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. शिवाय दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्येही जपान मोठी गुंतवणूक करणार आहे. ती झाल्यावर भारतात गेल्या वर्षाभरात झालेल्या गुंतवणुकीचा आकडा फार पुढे जाईल.

हा सारा मोदींच्या वर्षाभरातल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा परिणाम आहे. त्यांनी पायाभूत सोयी करण्याच्या कामालाही गती दिली आहे आणि एकूणच गुंतवणुकीला पूरक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे जगभरातल्या गुंतवणूक दारांचा ओढा भारताकडे आहे. मोदींच्या या कामात भूमि अधिग्रहण विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने अडचणी येत आहेत आणि हे विधेयक त्यांना मंजूर करून घेता आले नाही ही त्यांच्यासाठी नामुष्की आहे असे काही लोक वारंवार सांगत आहेत पण ती काही वस्तुस्थिती नाही. जीएसटी विषयीही असेच सांगितले जात आहे पण ही दोन्ही विधेयके काही मोेदींनी मांडलेली नाहीत. ती कॉंग्रेस सरकारने मांडलेली आहेत आणि त्यांनाही ती बहुमत असून मंजूर करून घेता आलेली नाहीत. तेव्हा मोदी ही दोन विधेयके मंजून झाली नाहीत तरीही आपल्या कार्यक्रमाला गती देणारच आहेत.

Leave a Comment