प्रतिजैवकांचे व्यसन

doctor
पूर्वी डॉक्टरांना रुग्णांच्या जखमा का चिघळतात हे कळत नसे. पण हा जंतूंचा प्रताप आहे हे माहीत झाले आणि वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात अँटीबायोटिक्सचे युग सुरू झाले. या प्रतिजैवकांनी अनेकांचे प्राण वाचले आणि ती माणसाला वरदान ठरली. एकदा ही उपचारांची गुरूकिल्ली हाती येताच डॉक्टरांनी त्यांना सर्रास वापर करायला सुरूवात केली. पण या वरदानाची एक मख्खी आहे. ती जंतूंना नष्ट करीत असली तरीही त्यांचा वारंवार वापर करण्याने त्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती जंतूंमध्ये वाढायला लागते. आपल्यावर प्रतिजैवकाचा मारा करून आपल्याला संपवले जात आहे हे जंतूंना लक्षात यायला लागते आणि ते आपल्या आत ही प्रतिकार शक्ती विकसित करायला लागतात. परिणामी काही प्रतिजैवके काही आजारांवर काम करेनाशी होतात. ती परिणामकारक ठरत नाहीत.

वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रतिजैवकांचा सातत्याने आणि अतिरेकी वापर झाला तर ती निष्प्रभ ठरतात. तसे आता दिसायलाही लागले आहे. जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका पाहणीत तसे आढळूनही आले आहे. या पाहणीत जगातली काही प्रतिजैवके आता पूर्णपणे निकामी ठरली आहेत. अशा स्थितीत त्या प्रतिजैवकांत काही बदल करावे लागतात पण तरीही त्यांचा प्रभाव वाढत नाही. भारतात ही गोष्ट प्रामुख्याने दिसून आली आहे. भारतात दरसाल प्रतिजैवकांच्या १३ अब्ज गोळ्या वापरल्या जातात. अमेरिकेत हे प्रमाण १० अब्ज एवढे आहे तर चीनमध्ये सात अब्ज आहे. म्हणजे भारतात प्रतिजैवकांचा वापर अतिरेकी म्हणता येईल असा झाला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की काही जीवघेणे जंतू आता मोकाट होणार आहेत.

न्यूमानियावर काम करणारे क्लेबसीला हे अँटीबायोटिक्स आता काम करेनासे झाले आहे. न्यूमोनियाच्या जंतूची या औषधाला प्रतिकार करण्याची शक्ती भारतात ५७ टक्क्याने वाढली आहे. ती युरोपात मात्र केवळ ५ टक्के आहे. याचा अर्थ युरोपात ते संयमाने वापरले जाते तर भारतात ते वारेमाप वापरले जाते. भारतात या जंतूची प्रतिकारशक्ती २९ टक्के होती. ती एकाच वर्षात ५७ टक्क्यावर गेली. अशीच स्थिती इतरही काही जंतू आणि औषधांच्या संबंधात झाली आहे. तेव्हा यापुढे अन्यही औषधांवर असा परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा आवश्यक तेथेच आणि मर्यादित वापर केला पाहिजे. पण डॉक्टरांना हा शॉर्ट कट वाटतो. अन्य काही उपाय करण्याऐवजी अँटीबायोटिक्स टोचले की भागते ही त्यांची प्रवृत्ती झाली आहे.

Leave a Comment