कॉंग्रेसला धक्का

congress
पंजाबात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून वाद जारी आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हे पद हवे आहे आपण पक्ष श्रेष्ठींनी त्यांना ते मिळणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. अमरिंदरसिंग हे तसे काबील नेते आहेत. पंजाब कॉंग्रेसमध्ये ते मोठे आक्रमक नेते मानले जातात. पंजाबात कॉंग्रेसचे वर्चस्व पूर्णच संपत आले असताना त्यांनी पक्षाला सत्तेवर आणून दाखवले. त्यामुळे आपला या पदावर हक्क आहे असे त्यांना वाटते. त्यांची नाराजी साहजिक आहे. विशेषत: त्यांच्या ऐवजी ज्याला या पदावर नेमले जाणार आहे ते नेते पंजाबातले नाहीत. ते दिल्लीत स्थायिक झालेले आहेत. अशा या माणसाला या पदावर नेमून पक्षश्रेष्ठींना काय साध्य करायचे आहे हे काही माहीत नाही पण त्याचा परिणाम म्हणून अमरिंदरसिंग हे पक्ष सोडणार आहेत.

अमरिंदरसिंग हे माजी संस्थानिक आहेत आणि त्यांची कॉंग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची क्षमता आहे. त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी काही आमदार आणि माजी आमदारांना चर्चेस पाचारण केेले होते. त्यांच्या इतरही काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहेत. कॉंग्रेसमधील मोठा गट त्यांच्या मागे जाण्याची शक्यता तर आहेच पण भाजपा आणि अकाली दलातलेही काही नेते त्यांच्या पक्षात येण्याचा संभव आहे. या सगळ्या चर्चा सुरू असल्याच्या बातम्याही काही वृत्तपत्रांत येत आहेत पण स्वत: अमरिंदरसिंग यांनी या बातम्यांचा इन्कार केला आहे. आपण कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि या पक्षाला कधीच दगा देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

तसे मानायला काही हरकत नाही पण अमरिंदरसिंग हे कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ वगैरे काही नाहीत. ते काही लहान असल्यापासून कॉंग्रेसमध्ये नाहीत. मुळात ते अकाली दलात होते. नंतर कॉंग्रेसमध्ये आले आहेत. तेव्हा त्यांनी अशा निष्ठेच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही. कॉंग्रेस पक्षातही त्यांच्या या निष्ठेविषयी संशय आहे. म्हणूनच पक्षाचा त्यांच्या या निष्ठेच्या आणाभाकांवर विश्‍वास नाही. म्हणूनच त्यांच्या या कारवाया सहन न होऊन पक्षाने त्याना निलंबित करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात तसे झाल्याने त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. उलट कॉंग्रेस पक्ष अधिकच विकलांग होईल.

Leave a Comment