संघाची समाजसुधारणा

rss
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी नेमकी काय असा प्रश्‍न नेहमीच विचारला जात असतो पण हिंदू राष्ट्र निर्माण करणे हीच आपली विचारसरणी असे मोघम उत्तर दिले जाते. हे उत्तर मोघम आहेच पण हिंदू राष्ट्र ही संकल्पनाही अशीच ढोबळ आहे. मुळात हिंदू धर्म हा अन्य धर्मासारखा संप्रदाय नाही. तर ती अनेक संप्रदायांनी निर्माण केलेली जीवन पद्धती आहे. त्यामुळे या संकल्पनेचा मोकळे चाकळे पणा संघाच्या विचाराच्या मोघमपणाला अधिकच मोघम बनवत असतो. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांना एका व्यक्तीने वनस्पती तुपाचे कथित दुष्परिणाम समजावून सांगितले आणि संघाने आपल्या स्वयंसेवकांना या तुपाचा वापर न करण्याचा आदेश द्यावा अशी सूचना केली. गुरूजींनी त्यास नकार तर दिलाच पण संघात असा कोणाला आदेश देण्याची पद्धत नाही असे म्हटले. हिंदू धर्माला चांगले दिवस यावेत, हिंदूंनी संघटित व्हावे आणि शिस्तीने जगायला, काम करायला शिकावे अशी संघ स्थापनेमागची प्रेरणा आहे. ती ज्यांना मान्य आहे ते संघाच्या शाखेवर जमतात आणि त्यांच्या चर्चेतून जे काही पुढे येते तोच संघाचा विचार असतो असे ते म्हणाले.

डॉ. के. ब. हेडगेवार हे संघाचे संस्थापक. ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते पण महात्मा गांधींच्या मुस्लिम अनुनयाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी त्यांनी संघाची स्थापना केली. हिंदुहित हे त्यांचे धोरण. डॉ. हेडगेवार हे काही म. फुले, न्या. रानडे, आगरकर यांच्यासारखे समाजसुधारक नव्हते. त्यामुळे संघाने तसे कामही केले नाही आणि संघ त्यासाठी कधी ओळखलाही गेला नाही. हिंदूना संघटित करणे हेच त्यांचे काम राहिले. त्यांच्या प्रेरणा राजकीय होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर हेही हिंदू संघटकच होते पण ते कट्टर विज्ञानवादी होते. हिंदूंचा प्रभाव वाढवायचा असेल तर हा समाज आधुनिक झाला पाहिजे व त्याने जुन्या कालबाहय रूढींचा त्याग केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी या धर्मातल्या अनेक रुढींना जाहीरपणे विरोध केला. हा समाज देवलसी वृत्तीचा असून त्याने ही वृत्ती सोडली नाही आणि तो जुन्या परंपरांना चिटकून बसला तर त्याचे अस्तित्वही राहणार नाही असे त्यांचे मत होते. त्यांचा यज्ञाला विरोध होता. गायीविषयीची त्यांची मते तर फारच परखडपणाची होती. ती गेल्या काही दिवसांत गोवध बंदीच्या कायद्याच्या निमित्ताने पुन्हा सांगितली गेली आहेत. गाईला आपली माता मानणे म्हणजे बैलाला आपला बाप मानणे होय असे ते म्हणत असत. संघाने आजवर हे मत कधीच मानले नाही. उलट सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेची टिंगलच केली. समाजातल्या कालबाह्य रूढींच्या बाबतीत संघाने आजवर कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही.

खरे तर एखादा समाज सुधारणे म्हणजेच तो काळानुसार बदलणे. जुन्या रूढींच्या जोखडातून मुक्त होणे. हीच भूमिका महात्मा फुले यांच्यासारख्या समाज सुधारकांनी मांडली. पण संघात या संबंधाने अशी चर्चा होत असे तेव्हा अशा सुधारणा समाजात आपोआप होत असतात असे संघाचे नेते सांगत असत. याबाबतीत संघाची भूमिका थोडीफार टिळकांच्या जवळपास जाणारी होती. त्यामुळे संघाने कधीही समाजातल्या निरर्थक व्रतवैकल्यांना विरोध केला नाही आणि देवालयांत चालणार्‍या बुवाबाजीचा प्रतिकार केला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातल्या अस्पृश्यतेचा निषेध करून हा धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा संघाने कसलीच ठाम भूमिका घेतली नाही. डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांनी अध:श्रद्धा विरोधी चळवळ चालवली तेव्हाही संघ तिच्यापासून दूर राहिला. खरे तर ती चळवळ हिंदू धर्माच्या हिताची होती. नंतर त्यांनी अध:श्रद्धा विरोधी विधेयकाचा आग्रह धरला तेव्हाही संघाने त्यांना विरोध केला. आता मात्र संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी कालबाह्य रुढींचा त्याग करण्याचे आवाहन केले आहे.

भारतात हा विचार एकोणिसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात राजा राममोहन रॉय यांनी प्रथम मांडला म्हणून या दशकाला भारतीय प्रबोधनाचे युग म्हटले जाते. त्याला आता दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत आणि हिंदूचें संघटना करणारी संघटना आता तो दोन शतकापूर्वीचा विचार बोलून दाखवत आहे. या संघटनेला जगात काय चालले आहे हे फार उशीरा लक्षात येते. उशीरा आले तरी आता तरी त्यांनी विज्ञाननिष्ठ भूमिका घ्यायला काही हरकत नाही. डॉ. भागवत यांना हे कधी सुचले आहे हे माहीत नाही पण त्यांनी आता गोवध बंदीच्या संदर्भात जुना कालबाह्य विचार त्यागावा. गावातले पाणवठे एक करावेत. जातीजातीतला उच्च नीच भाव धर्माला आणि संघाला मान्य नाही असे जाहीर करावे. ते या गोष्टी करतील की नाही हे काही सांगता येत नाही. त्यांचा कालबाह्य रुढींना असलेला विरोध खरेच काही अभ्यासाअंती निर्माण झाला असेल तर त्यांनी खरेच आपला सुधारणांचा हा रथ नीट चालवावा. नाही म्हटले तरी आज संघ ही हिंदू धर्माची सर्वात मोठी संघटना आहे. तिने हा दृष्टीकोन स्वीकारला तर तो हिंदू धर्माचा अधिकृत दृष्टीकोन म्हणून मानला जाईल. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले असूनही समाजातल्या अंध:श्रद्धा संपण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. या अध:पतनाला संघाने खरेच रोख लावावा.

Leave a Comment