आयफोनसाठी किडनी विकण्याचा दोन तरुणांनी केला प्रयत्न

iphone
बीजिंग- ‘आयफोन ६ एस’ हा मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी चक्क आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न चीनमधील जिंग्सू प्रांतातील दोन तरुणांनी केल्याचे उघडकीस आले आहे.

‘आयफोन ६ एस’ हा मोबाईल फोन घेण्याची इच्छा वु नावाच्या तरुणाला होती. मात्र त्याच्याकडे इतके पैसे नसल्यामुळे त्याचा मित्र हुआंग याने त्याला आपण किडनी विकू या, असा सल्ला दिल्याचे चायना डेली या वृत्तपत्रात म्हटले आहे. त्यानंतर त्या दोघांनी एका इंटरनेटवरील बेकायदेशीर एजंटशी संपर्क साधला. एजंटने दिलेल्या निर्देशानुसार ते दोघेजण नान्जिंग येथील रुग्णालयात १२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठीही गेले होते. मात्र, तो एजंट त्यावेळी रुग्णालयात वेळेवर पोहचला नाही.

त्यामुळे वुने अवयव विक्रीवर पुनर्विचार करत किडनी न विकण्याचा निर्णय घेतला. तसे त्याने हुआंगला सांगितले. मात्र, हुआंगने त्याचे ऐकले नाही. त्यामुळे वुने सदर गोष्ट पोलिसांच्या कानावर घातली. मात्र याची कुणकूण लागल्याने पोलीस पोहचण्यापूर्वीच हुआंग तेथून फरार झाला असून त्याने त्याच्याकडील फोनही बंद ठेवला आहे.

Leave a Comment