मंगळावरील विवराच्या खाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर

nasa
वॉशिंग्टन : अंतराळ संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला असल्याचे म्हटले असून कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा हा थराचा तुकडा आहे. लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे. मंगळावर एक विवर भांड्यासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांड्यासारखी खोलगट व गोलाकार आहेत.

नेमके हेच विवर वेगळे का, या प्रश्नाचे उत्तर या बर्फाच्या थरात दडलेले आहे, अशी विवरे फार क्वचितच आढळतात, असे अ‍ॅरिझोना विद्यापीठाच्या ल्यूनर अ‍ॅण्ड प्लॅनेटरी लॅबोरेटरी किंवा एलपीएलचे सहायक प्राध्यापक शेन बायरन यांनी सांगितले. मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत. एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात (हायराईज) संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली. त्यानंतर एमआरओवरील शॅलो रडारने मंगळावरील काही प्रारणे टिपली त्यामुळे पृष्ठभागाखाली काय दडले आहे त्याचा शोध लागू शकला. एलपीएलचे विद्यार्थी अली ब्रॅमसन यांनी सांगितले की, रडार लहरींचा वेग मोजला गेला असून त्याच्या माहितीचे दोन संच आहेत, त्या माहितीवरून या विवराखाली बर्फाचा मोठा थर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची जाडी १३० फूट आहे. त्याचे क्षेत्रफळ कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकूण क्षेत्रफळाइतके आहे. ब्रॅमसन व बायरन यांना तेथे बर्फ असल्याचे समजल्याने आश्चर्य वाटले. त्याचे ठिकाण, प्रमाण व त्याचा काळ याचाही अभ्यास करण्यात आला आहे. मंगळाच्या ध्रुवीय भागातच बर्फ आहे, असा आतापर्यंतचा समज होता. पण आता मध्यावरही बर्फ सापडले आहे. कॅनडा व अमेरिका सीमा व कन्सास यांच्या दरम्यानच्या अक्षांशांवरील भागात बर्फ सापडण्यासारखा हा प्रकार आहे. त्यातून मंगळावरील पूर्वीचे वातावरण कसे होते हे सांगता येणार आहे.

Leave a Comment