कॉंग्रेस कधी सावरणार

congress
आपल्या देशातल्या राजकीय पक्षांत एक विकृती आहे. हे पक्ष सत्तेवर असतात तेव्हा काहीच करीत नाहीत आणि त्यामुळे पराभूत होऊन विरोधी बाकावर बसल्यावर तर काही करण्याचा प्रश्‍नच नसतो. विरोधी पक्षात बसले की ते नकारार्थी विचार करायला लागतात. सत्ताधारी काही तरी चूक करील आणि त्यानंतर आपल्याला आपोआप सत्ता कधी मिळेल याची ते वाट पहात राहतात. एकदा हातातली सत्ता गेली की ती पुन्हा मिळावी असे वाटण्यात काही चूक नाही पण त्यासाठी आपण काही तरी करावे असे त्यांना वाटत नाही. कॉंग्रेसचे नेते अशीच काही तरी प्रतीक्षा करीत आहेत. सत्ता गेल्यावर पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते मोदींची काही तरी चूक होतेय का याची वाट पहात आहेत. तशी चूक सरकारने केली नाही तरी वारंवार चुका दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत.पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेन्द्र मोदी यांच्या सरकारवर असाच हल्ला चढवताना हे सरकार हवाबाज असल्याचा आरोप केला. सोनिया गांधी या हा आरोप करीत असतानाच मोदी सरकार देशातल्या लाखो माजी सैनिकांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा वन रँक वन पेन्शन हा प्रश्‍न सोडवल्याची घोषणा करीत होते.

हा प्रश्‍न कॉंग्रेस सरकारला गेल्या ६० वर्षात सोडवता आला नव्हता. तो मोदींनी सव्वा वर्षात सोडवला. आता कोणाचे सरकार हवाबाज ठरले ? सोनिया गांधी यांनी कितीही आरोप केला तरी वस्तुस्थिती काही झाकलेली रहात नाही. मोदींनी सोनिया गांधी यांच्या हवेबाजीच्या आरोपाला खमंग उत्तर दिले आहे. हवाबाज सरकारमुळे हवालेबाजांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे असा टोला त्यांनी लगावला. या उत्तराला सोनिया गांधी यांनी प्रत्युत्तर दिलेले नाही. तसे त्या देत नाहीत कारण त्यांनी आरोप करताना फारसा विचार केलेला नसतो. गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी आणि राहुल गांधी मोदींवर आरोप करताना, सध्या देश एकाच व्यक्तीच्या कलाने चालत असल्याचे म्हटले होते. भाजपात मोदीशिवाय कोणी नाही आणि मोदीशिवाय कोणालाच किंमत नाही असे त्यांना म्हणायचे होते. त्यांनी हा आरोप केल्यानंतर काहीच दिवसांत काल कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नेमण्यात आले. गेली सतरा वर्षे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर सोनिया गांधी विराजमान आहेत. या पक्षाला १७ वर्षात एक नवे अध्यक्ष सापडले नाहीत. सोनिया गांधीही आपल्याला आता हे पद नको असे म्हणत नाहीत. स्वत: सतरा वर्षे एकाच पदावर राहताना त्या मोदीेवर मात्र एकाधिकार शाहीचा आरोप करीत आहेत.

अशा आरोपांनी आपली विरोधी पक्ष म्हणून असलेली प्रतिमा सुधारत असल्याचे त्यांना वाटत असेल पण प्रत्यक्षात त्यांचे हसे होत आहे. कॉंग्रेसने लोकसभेतली नीचांकी ४४ ही संख्या गाठली असूनही या पक्षात कसलेही आत्मपरीक्षण होत नाही. आपली संघटना एवढी क्षीण होत असतानाही तिला संजीवनी देण्याचा कसलाही कार्यक्रम पक्षाला राबवता आलेला नाही. केवळ सोनिया गांधींची आरती ओवाळत राहणे हाच एक कार्यक्रम राबवला जात आहे. सोनिया गांधी फार कमी वेळा बोलतात म्हणून त्यांचे हसे कमी वेळा होते. राहुल गांधी मात्र आता आता जरा जास्त विधाने करून जास्त वेळा हसे करून घेत आहेत. ते आता कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून त्यांना हे पद देण्यात आले आहे. अर्थात याही पदाला नवा माणूस मिळालेला नाही. सोनिया गांधी यांना अध्यक्षपद सोडायची इच्छा आहे पण त्यांना ते राहुल गांधी यांच्या हातात सोपवून मगच सोडायचे आहे. त्यांना राहुल गांधी या पदाला न्याय देण्यास पात्र झाले आहेत असे वाटेल त्या दिवशी त्या बाजूला सरकतील आणि राहुल गांधी यांना अध्यक्षपद देतील.

राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होण्यास पात्र आहेत की नाही हा मुद्दा वेगळा पण ते तसे पात्र आहेत असे मुळात सोनिया गांधी यांनाच वाटत नाही. त्यामुळे राहुल गांधी मोठी भूमिका घेण्यासाठी मेकअप करून विंगेत उभे आहेत आणि आपली एंट्री झालीच असल्यागत वागत आहेत पण त्यांची ही एंट्री अवेळी ठरेल असे त्यांच्या आईलाच वाटत आहे. उद्या चालून राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेच तरीही शेवटी कॉंग्रेस संघटनेत काही फारसा फरक पडणार नाही कारण सोनिया जाऊन राहुल येणे हे काही मोठे परिवर्तन नाही. कॉँग्रेस पक्ष घराण्यावरच अवलंबून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पक्षाच्या नेत्यांना हे कळायला हवे की, आता कॉंग्रेस पक्ष जगवायचा असेल तर त्याला काहीतरी नवा कार्यक्रम दिला पाहिजे. आता नव्या पिढीला गांधी नेहरू घराण्याविषयी आकर्षण राहिलेले नाही. तिला गांधी नेहरूच काय पण राजीव गांधीसुद्धा माहीत नाहीत. या नव्या पिढील आकर्षित करेल असे काही तरी द्यावे लागेल. ते देण्यासाठी पक्ष सक्षम असल्याचे आधी दाखवून द्यावे लागेल. पूर्वी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या सभा होत तेव्हा त्या व्यासपीठावर अन्य कोणाचेही भाषण होत नसे. पण आता सोनिया गांधी नितीशकुमार यांच्या व्यासपीठावर जात आहेत आणि दुय्यम स्थान स्वीकारून तिथे भाषण करीत आहेत.

Leave a Comment